सावंतवाडी : गोवा-पेडणे येथे भाड्याच्या टॅक्सी ड्रायव्हरवर प्राणघातक हल्ला करून सावंतवाडीत मध्यरात्री आलेल्या दरोडेखोरांच्या टोळीने शहरातही धुडगूस घातला. सावंतवाडी शहरातील तीन दुचाकी चोरून पोबारा केला, तर एका घरात चोरी करण्याचा प्रयत्न या टोळीने केला. या दरोडेखोरांच्या मागावर पेडणे पोलिस असून, गोवा व सिंधुदुर्ग पोलिसांची टीम संयुक्तरीत्या मोहीम राबवून त्यांचा शोध घेत आहे.
दरम्यान, सावंतवाडी पोलिसांचे पथक चोरट्यांच्या मागावर असून, शहरातून चोरीस गेलेली दुचाकी कणकवली -सावडाव येथे सापडली आहे. गुरुवारी सायंकाळी अति.पोलीस अधिक्षक नयोमी साटम यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्याला भेट देत याबाबत माहिती घेतली तर दुचाकी चोरुन नेलेल्या व घरात चोरीचा प्रयत्न झालेल्या घटनास्थळी जात त्यांनी माहिती घेतली.
बुधवारी मध्यरात्री गोवा-पेडणे येथे 6 जणांच्या दरोडेखोरांच्या टोळीने धुडगूस घातला.पेडणे येथे एका घरात दरोडा टाकून या टोळीने भाडयाने टॅक्सी बुक केली, त्यानंतर त्याच टॅक्सीने येत असताना पेडणे दरम्यान चालकावर प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर दरोडेखोर सावंतवाडीच्या दिशेने निघाले.
दरम्यान, बुधवारी मध्यरात्री ते गुरुवारी सकाळपर्यंतच्या कालावधीत दरोडेखोरांनी सावंतवाडी शहरातदेखील एका घरात चोरीचा प्रयत्न केला. शहरातील एका हेल्थ फार्मच्या बाजूला असलेल्या व्यवस्थापिका मिनल भिरंगुळे यांच्या कार्यालया बाहेर पार्क पल्सर दुचाकी तर शिल्पग्राम येथे बाहेर झोपलेले त्यांचे दोन कामगार यांचे दोन मोबाईल फोन तसेच खासकिलवाडा लक्ष्मीनगर येथील घरासमोरील पार्क केलेली पावलीन पास्कोल रॉड्रीक्स यांच्या मालकीची स्पलेंडर दुचाकी चोरुन नेली आहे. तसेच जेलच्या मागे असलेल्या नरसू रेडकर यांच्या वरच्या मजल्यात भाडयाने राहणार्या राजेशकुमार सिन्हा यांच्या घरात खिडकीतून हात घालून कपाट उघडत चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात काही चोरीस गेले नाही.
माजगाव गरड येथूनही एक दुचाकी चोरीस गेल्याची माहिती आहे .मात्र, त्याची नोंद पोलीस ठाण्यात नाही.दरम्यान चोरीस गेलेल्या तीन दुचाकींपैकी रॉड्रीक्स यांची स्पलेंडर दुचाकी कणकवली-सावडाव येथे गुरुवारी मिळाली. मात्र दरोडेखोर उशीरापर्यंत पोलीसांच्या हाती लागले नाहीत. या सर्व गुन्हयांची नोंद सावंतवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. शहरातील सीसीटिव्ही फुटेजद्वारा पोलीस तपास करत आहेत.
सहा.पोलीस निरीक्षक जयेश खंदरकर व पोलीसांची टिम चोरटयांच्या मागावर आहे. या सर्व गुन्हयांचे कनेक्शन पेडणे -गोवा येथील दरोडयाशी असून त्यांनी पळून जाण्यासाठी सावंतवाडीतील दुचाकी व मोबाईल फोन चोरले असून त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे त्यांनी शहरातील एका घरात चोरीचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या हाती काही लागले नाही.
दरम्यान,सायंकाळी अति. पोलीस अधिक्षक नयोमी साटम यांनी सावंतवाडी येथे भेट दिली.पोलीस ठाण्यात त्यांनी गुन्हयाचा आढावा घेतला. तपासाची माहिती घेत दुचाकी चोरी,मोबाईल फोन चारी,व घरफोडीचा प्रयत्न झालेल्या घटनास्थळी त्यांनी भेट देवून पहाणी केली.चोरी करणारी दरोडेखोरांची विशिष्ट टोळी रामोशी व फासेपारधी या समाजाची असण्याची शक्यता पोलीसांनी वर्तवली आहे.
ठिकठिकाणी चोरी करुन केला पोबारा;
एका घरात चोरी करण्याचा प्रयत्न
चोरीस गेलेलीदुचाकी सापडली; सहापैकी एक चोरटा अटकेत
दरम्यान, हल्ला झाल्यावर जखमी टॅक्सी चालकाने तातडीने पेडणे पोलिसांना याची माहिती दिली. दरोडेखोर यांचा पेडणे पोलिसांनी पेडणे ते बांदा हायवेवर थरारक पाठलाग केला. यात दरोडेखोर्यांनी सावंतवाडी येथे येत काही काळ आसरा घेतला, त्यामुळे ते पोलिसांच्या हाती सापडले नाहीत. या सहा जणांपैकी एका दरोडेखोराला पेडणे-गोवा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, अन्य पाच जणांचा शोध सुरू आहे.