

मोहोळ शहर : शक्तिपीठ महामार्गातील अडीअडचणी संदर्भात महसूल प्रशासन व इतर विभागांच्या मार्फत मोहोळ व घाटणे या दोन गावांची तहसीलदार कार्यालयात झालेल्या बैठकीप्रसंगी शेतकर्यांनी तोंडाला मास्क लाऊन नियोजित शक्तिपीठ महामार्गाचा निषेध नोंदविला.
कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन द्यायची नाही. शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकर्यांची जमीन सक्तीने घेण्याचा प्रयत्न केल्यास आम्हा सर्व शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांना राष्ट्रपतीच्या सही शिक्क्याने स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी मोहोळ तालुक्यातील शक्तीपीठ बाधित शेतकरी संघर्ष समितीने केली. बैठकीवेळी तोंडाला मास्क लावून आणि ठळक अक्षरांमधील सरकारला ‘आम्हाला शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन द्यायची नाही’अशा प्रकारचे फलक घेऊन शेतकर्यांनी निषेध व्यक्त केला.
या बैठकीला पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, मोहोळ तहसीलदार सचिन मुळीक, उपाधीक्षक भूमी अभिलेख प्रकाश कांबळे, मंडल कृषी अधिकारी कृष्णा थिटे यांच्यासह विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते. यावेळी मोहोळ तालुका शक्तीपीठ बाधित संघर्ष कृती समितीचे शाहूराजे देशमुख, सत्यवान देशमुख, राजेंद्र देशमुख, बाळासाहेब पवार, दिनेश घागरे, अॅड.श्रीरंग लाळे, महेश देशमुख, व इतर शेतकरी उपस्थित होते.