

हरिश्चंद्र पवार
सावंतवाडी : सावंतवाडी नगराध्यक्षपद आरक्षण ‘सर्वसाधारण महिला’ निश्चित झाल्याने शहराच्या कारभाराची सूत्रे पुन्हा एकदा महिलेच्या हाती येणार आहेत. आता पर्यंत आनारोजिन लोबो, श्वेता शिरोडकर आणि पल्लवी केसरकर अशा तीन महिलांनी सावंतवाडी नगराध्यक्षपदाची यशस्वी धुरा सांभाळली आहे. यामुळे ऐतिहासिक सावंतवाडीची चौथी महिला नगराध्यक्षा कोण होणारी? याची उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला आरक्षीत असल्याने सर्वच पक्षांमधील महिला नेत्यांच्या सुप्त इच्छेला धुमारे फुटू लागले आहेत.
आरक्षण जाहीर होताच शहरातील राजकीय वातावरण सक्रिय होण्या सुरूवात झाली आहे. विविध पक्षांमधील संभाव्य उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी तयारी सुरू केली आहे. उमेदवारांची तयारी आणि निवडणुकीची रणनिती पाहता, आगामी निवडणूक विशेष लक्षवेधी आणि अटीतटीची ठरणार आहे यात शंका नाही. माजी नगराध्यक्ष व शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमूख संजू परब यांच्या पत्नी संजना परब या महायुतीतून या पदासाठी प्रबळ दावेदार आहेत. मात्र यात भाजपची भूमिका महत्वाची रहाणार आहे. या शिवाय शिंदे शिवसेनेच्या अॅड. नीता गावडे , भाजपच्या मोहिनी मडगांवकर, माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांच्याही नावांचा विचार होऊ शकतो. तर विरोधी महाविकास आघाडीकडून ठाकरे शिवसेनेच्या समीरा खलील, काँग्रेसच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी यांची नावे चर्चेत आहेत.
सावंतवाड नगराध्यक्ष निवडणुकीत माजी मंत्री आ. दीपक केसरकर यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. केसरकर हे केवळ सावंतवाडीचे आमदार नाहीत, तर राज्य मंत्रिमंडळातील एक प्रमुख नेते आहेत. स्थानिक राजकारणावर त्यांचा प्रभाव असल्याने या निवडणुकीत त्यांची भूमिका महत्त्वाची असेल. सावंतवाडी नगरपरिषदेवर पुन्हा आपली सत्ता कायम ठेवणे हे आ. केसरकरांचे मुख्य उद्दिष्ट असेल. कारण नगरपरिषदेवर नियंत्रण असल्यास स्थानिक पातळीवरील विकासकामांमध्ये अधिक सुसूत्रता आणता येते आणि आमदारांच्या योजनांना गती मिळते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील विजय म्हणजेआपली राजकीय ताकदआणि पकड सिद्ध करणे होय. यामुळे राज्याच्या राजकारणात त्यांचे वजन कायम राहण्यास मदत होते. नगराध्यक्ष निवडणूक ही केवळ ‘ओपन महिला’ उमेदवाराची नसून, ती आ. दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाची कसोटी असेल. ते ज्या महिलेला पाठिंबा देतील, त्या उमेदवाराची बाजू आपोआपच भक्कम होईल आणि निवडणूक युती विरुद्ध विरोधक अशी न होता, एका अर्थाने ‘केसरकर समर्थक’ विरुद्ध ‘विरोधक’अशी होण्याची शक्यता आहे.
‘मविआ’चा विचार केल्यास सावंतवाडी शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा प्रभाव तुलनेने अधिक आहे, त्यामुळे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी ठाकरे गट आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो, तर इतर पक्षांना नगरसेवक पदाच्या जागा मिळतील. ज्या प्रभागांमध्ये काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून येण्याची क्षमता आहे, तेथे ते आपले उमेदवार उभे करतील.:तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांच्या उमेदवारांना मदत करून मत हस्तांतरण (तेींश ढीरपीषशी) यशस्वी करण्याचा प्रयत्न करतील.
विकास विरुद्ध बदल :
निवडणुकीचा कल सहसा दोन ध्रुवांवर विभागलेला असतो : सत्ताधारी पक्षाने केलेल्या विकासाला पाठिंबा देणे किंवा बदल हवा म्हणून विरोधी पक्षाला संधी देणे. ‘ओपन महिला’ उमेदवार शहरातील महिलांचे प्रश्न किती प्रभावीपणे मांडते, यावरही कल अवलंबून असेल. सावंतवाडीला एक समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे, ज्यामुळे येथील नागरिक शहराच्या प्रतिष्ठेबद्दल संवेदनशील आहेत.
सावंतवाडी नगरपालिकेच्या इतिहासात आतापर्यंत तीन कर्तृत्ववान महिलांनी नगराध्यक्ष पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे. यामध्ये आनारोजिन लोबो, श्वेता शिरोडकर आणि पल्लवी केसरकर यांचा समावेश आहे. या तिघींनीही आपापल्या कार्यकाळात शहराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या पार्श्वभूमीवर, आता नगराध्यक्ष पदावर विराजमान होणारी चौथी महिला नगराध्यक्ष कोण असेल, याची उत्सुकता सावंतवाडीकरांना लागून राहिली आहे.