

सावंतवाडी : कुडाळ तालुक्यातील माणगाव -गोठोसवाडी येथे एकाच कुटुंबातील पाच सदस्यांना विषारी आळंबी खाल्ल्याने विषबाधा झाली. सुभाष पवार (36), शीला पवार (30), सुप्रिया पवार (8), सावन पवार (10) आणि चंद्रशेखर स्वामी (40) अशी विषबाधा झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ.ज्ञानेश्वर ऐवळे यांनी दिली.
या कुटुंबाने घराच्या बाजूला उगवलेली आळंबी रविवारी दुपारी खाल्ली. त्यानंतर दु. 2 वा. च्या सुमारास त्यांना त्रास जाणवू लागला. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना माणगाव आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना 108 रुग्णवाहिकेद्वारे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.
या घटनेमुळे चार दिवसांपूर्वी चौकुळ येथे विषारी आळंबी खाल्ल्याने झालेल्या चार जणांच्या विषबाधेच्या घटनेची आठवण झाली आहे. दरम्यान, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने या घटनेतील पीडित कुटुंबाला मदत केली आहे. संस्थेने नागरिकांना आळंबी खाताना योग्य काळजी घेण्याचे आणि कोणतीही अनोळखी आळंबी न खाण्याचे आवाहन केले आहे.