

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीत मंगळवारी ऐन मतदानाच्या दिवशीच लक्षवेधी ठरलेल्या प्रभाग क्र. 7 मध्ये खुलेआम पैसे वाटप करण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रार करत एकमेकांना धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकारानंतर दिवसभर अनेक उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या प्रभागात पैसे वाटले जाऊ नयेत यासाठी वॉच ठेवला.
पैसे वाटपाच्या या प्रकाराला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार संजू परब तर उबाठा नगरसेवक उमेदवार यांचे प्रतिनिधी आशिष सुभेदार व दोन्ही पक्षाचे पदाधिकारी यांनी या प्रकाराविरोधात जोरदार आक्षेप घेतला. यावेळी पैसे वाटप करणार्या लोकांना आणि अन्य काहीजणांना धक्काबुक्की करण्यात आली. त्यामुळे प्रकरण हाताबाहेर गेले. यावेळी पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत प्रकरण आवरले. काहीजणांना तंबी देत तेथून बाहेर काढले. त्यामुळे या वादावर पडदा पडला. तरीही प्रभागात पैसे वाटप सुरूच होते.
प्रभाग क्र.7 मध्ये भाजपचे उमेदवार उदय नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब हे नगरसेवक पदाकरिता उभे असून या प्रभागात हाय होल्टेज लढत होत आहे. त्यात खुद्द शिवसेना जिल्हाप्रमुख परब निवडणूक लढवत असल्यामुळे ही लढत त्यांनी प्रतिष्ठेची केली आहे. तर परब यांना पराभूत करण्यासाठी भाजप पक्षाने मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. मतदानाच्या दिवशी सकाळी
9 वा. खासकीलवाडा येथे काहीजण गाडीतून बुथच्या ठिकाणी आले. त्यांनी मतदारांना पैसे वाटप करण्यास सुरुवात केली. हा प्रकार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे युवा तालुकाप्रमुख व उमेदवार आर्या सुभेदार यांचे प्रतिनिधी आशिष सुभेदार यांनी पाहिला. त्यानंतर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह जात पैसे वाटप करण्यास प्रतिबंध केला. ही बाब शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांना समजताच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह त्या ठिकाणी धाव घेतली. यावेळी याचा जाब विचारत वादावादी होऊन धक्काबुक्कीचे प्रकार झाले.
संजू परब यांचा भाजपवर आरोप
पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला. पैसे वाटप करणार्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी तेथून घालवले. संजू परब यांनी पैसे वाटप करण्याचे प्रकार चुकीचे आहेत, भाजपचे कार्यकर्ते प्रभाग 7 मध्ये पैसे वाटण्यासाठी तळ ठोकून आहेत. त्यांना त्याशिवाय पर्याय नाही. त्यांच्याकडे स्थानिक नेते नाहीत. पोलिसांनी हे प्रकार वेळीच रोखावेत असे आवाहन केले.
या प्रकारानंतर पोलिसांनी प्रभाग 7 मध्ये कडक बंदोबस्त ठेवला.जी संशयित गाडी पैसे वाटप करत होती तिच्यावर उबाठा सेना, शिवसेना, काँग्रेसचे कार्यकर्ते लक्ष ठेवून होते. प्रभाग क्र.6 मध्ये देखील पैसे वाटपाचा प्रकार घडला. त्याला शिवसेनेचे उमेदवार देव्या सूर्याजी यांनी जोरदार हरकत घेतली. यावेळी पोलिसांनी तेथे धाव घेत हा प्रकार बंद पाडला. मतदान संपेपर्यंत काही प्रभागात पैसे वाटप करण्याचे प्रकार खुलेआम सुरू होते अशी चर्चा आहे.