

सगुण मातोंडकर
वेंगुर्ले : वेंगुर्ले नगरपरिषदेची निवडणूक रणधुमाळी आता शिगेला पोचली आहे. या नगरपरिषदेत भाजप, शिंदे शिवसेना, उबाठा शिवसेना व काँग्रेस यांच्यात अतितटीची चौरंगी लढत होणार आहे. गत वेळची भाजपची सत्ता अबाधित राखण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. तर विरोधकांनी तोडीस तोड उमेदवार देवून भाजप समोर आव्हान उभे केले आहे. त्यामुळे वेंगुले नगरपरीषद निवडणूक चुरशीची होणार आहे.
वेंगुले नगरपरिषदेवर 2016 च्या झालेल्या निवडणुकीत भाजपचे पहिले नगराध्यक्ष म्हणून राजन गिरप निवडून झाले होते. त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्हयात भाजपच्या कमळ चिन्हावर निवडून येणारे राजन गिरप हे पहिले नगराध्यक्ष ठरले होते. त्यावेळी माजी नगराध्यक्ष संदेश निकम आणि माजी नगराध्यक्ष सुनील हुबळे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. सुनील हुबळे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे काँग्रेसचे अधिकृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बाबत्ती वायंगणकर तसेच संदेश निकम यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रमण वायंगणकर यांचा पराभव झाला होता. अपक्ष उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणात विभागल्या गेलेल्या मतांचा फायदा भाजपच्या दिलीप गिरप यांना झाल्याने ते नगराध्यक्षपदी निवडून आले होते.
वेंगुले नगरपरिषदेच्या 2016 मधील निवडणुकीत भाजपचे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांना 1990 मते मिळाली होती. अपक्ष उमेदवार सुनील डुबळे यांनी दुसऱ्या क्रमांकाची 1293 मते होती. शिवसेनेचे उमेदवार रमण वायंगणकर यांना 1226 तर अपक्ष संदेश निकम यांना 1024 मते मिळाली होती. काँग्रेसचे बाबली वायंगणकर यांना 948 मते मिळाली होती. काँग्रेस व शिवसेनेमधील बंडाळीमुळे भाजपचे उमेदवार राजन गिरप सहजपणे नगराध्यक्षपदी निवडून आले होते. त्यावेळी वेंगुर्ले नगरपरिषदेवर भाजपचा नगराध्यक्ष तसेच 17 पैकी 6 नगरसेवक निवडून आले होते. त्यामध्ये प्रशांत आपटे, सुहास गवंडळकर, नागेश उर्फ पिंटू गावडे, धर्मराज कांबळी, श्रेया मयेकर व साक्षी पेडणेकर यांचा समावेश होता. तसेच नारायण राणेंच्या काँग्रेसला नगराध्यक्षपद गमवावे लागले होते. तरी काँग्रेसचे 7 नगरसेवक निवडून आले होते. त्यामध्ये विधाता सावंत, प्रकाश डिचोलकर, स्नेहल खोबरेकर, कृतिका कुबल, शीतल आंगचेकर, पूनम जाधव व कृपा गिरप यांचा समावेश होता. शिवसेनेच्या एकमेव अस्मिता राऊळ या नगरसेवक निवडून आल्या होत्या.
आताची वेंगुले नगरपरिषद निवडणूक चुरशीची ठरणार आहे. वेंगुले नगरपरिषदेच्या प्रभाग 10 मधील 20 नगरसेवक पदासाठी निवडणूका होणार आहेत. त्यासाठी भाजपकडून 20 जागावर नगरसेवक पदाचे उमेदवार उभे आहेत. शिंदे शिवसेनेकडूनही निवडणुकीत 20 जागांवर उमेदवार उभे केले आहे. उबाठा शिवसेनेनेे 17 जागांवर उमेदवार दिले आहे. तर काँग्रेसनेही 17 जागांना उमेदवार दिले आहेत. काँग्रेसचे निष्ठावंत नेते विलास गावडे या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी निवडणूक रिंगणात आहेत.
वेंगुर्ले नगरपरिषद निवडणूक चौरंगी लढतीत होणार असल्याने व सर्वच पक्षाकडून प्रबळ उमेदवार रिंगणात असल्यामुळे यावेळच्या निवडणुकीकडे वेंगुले शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. वेंगुर्ले नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे दिलीप उर्फ राजन गिरप, शिंदे शिवसेनेकडून निवडणूक लढणारे नागेश उर्फ पिंटू गावडे, राष्ट्रीय काँग्रेसकडून निवडणुक विलास गावडे व उबाठा शिवसेनेकडून निवडणूक संदेश निकम असे चार उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. तसेच अपक्ष म्हणून नागरी कृती समितीचे ॲड. नंदन वेंगुर्लेकर व सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ टोमके हे दोन उमेदवार नगराध्यक्षपदासाठी निवडणूक रिंगणात उतरले आहेत.