सावंतवाडी : कोव्हिड-१९ महामारीच्या काळात सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावरून रद्द करण्यात आलेले राजधानी एक्सप्रेस आणि गरीब रथ एक्सप्रेसचे थांबे पूर्ववत करण्यासाठी, तसेच मंगळुरू एक्सप्रेसला कायमस्वरूपी थांबा मिळवून देण्यासाठी 'कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी (स्थानिक व मुंबई विभाग)' गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष करत होती. या प्रखर आणि प्रदीर्घ लढ्याला अखेर ऐतिहासिक यश आले आहे.
या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना संघटनेचे उपाध्यक्ष सागर तळवडेकर आणि मुंबई अध्यक्ष विनोद नाईक म्हणाले, हा विजय प्रत्येक चाकरमान्याच्या कष्टाचा आणि प्रवाशांच्या एकजुटीचा आहे. नुकतेच राज्य मंत्रिमंडळाने २८ मे रोजी सावंतवाडी स्थानकाचे नाव बदलून 'प्रा. मधु दंडवते रेल्वे टर्मिनस सावंतवाडी' करण्यास मंजुरी दिली आहे. आता आमचे पुढील लक्ष्य सावंतवाडी टर्मिनसचे काम पूर्ण करणे, कोकण रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत पूर्णपणे विलीनीकरण करणे हेच असणार आहे.
"या ऐतिहासिक लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे मुंबई विभागाचे पदाधिकारी, ज्येष्ठ मार्गदर्शक अभिमन्यू लोंढे, रेल्वे अभ्यासक अक्षय महापदी आणि रस्त्यावर उतरून साथ देणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचे आभार संघटनेचे अध्यक्ष अॅड. संदीप निंबाळकर आणि सचिव मिहिर मठकर यांनी मानले आहेत. पूर्वीप्रमाणे गाड्या सुरू होणे हे आमचे लक्ष होते आणि गाड्या सुरू झाल्यामुळे प्रवाशांची संख्या सुद्धा वाढणार आहे त्यामुळे या गाड्यांचा प्रवाशांना फायदा नाही असे म्हणणे चुकीचे असल्याचे मिहिर मठकर यांनी बोलताना सांगितले.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ७ जुलै रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अधिकृत पत्र पाठवून या तीनही महत्त्वाच्या गाड्यांना सावंतवाडी स्थानकावर तातडीने थांबा देण्यास अंतिम मंजुरी दिली आहे. रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयामुळे मुंबईत राहणारे लाखो चाकरमानी, स्थानिक रुग्ण आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
तीन वर्षांचा संघर्ष आणि उग्र आंदोलन
सावंतवाडी हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रमुख प्रवेशद्वार आणि 'NSG-4' श्रेणीतील महत्त्वाचे महसुली स्थानक आहे. असे असूनही कोव्हिड काळात रेल्वे प्रशासनाने १२४३१/३२ राजधानी एक्सप्रेस आणि १२२०१/०२ गरीब रथ एक्सप्रेसचे येथील थांबे रद्द केले होते. हे थांबे पुन्हा सुरू करण्यासाठी संघटनेने प्रशासनासोबत अनेक बैठका घेतल्या. परंतु, "प्रवासी संख्या कमी आहे" (Poor Patronage) असे चुकीचे कारण पुढे करत रेल्वे प्रशासनाकडून वेळकाढूपणा केला जात होता.
प्रशासनाच्या या भूमिकेविरोधात संघटनेने २६ जानेवारी २०२४ रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी स्थानकावर उग्र जनआंदोलन व लाक्षणिक उपोषण केले. तसेच मागण्या मान्य न झाल्यास २५ जानेवारी २०२५ रोजी रेल रोको' करण्याचा इशारा दिला होता. या जनक्षोभाची दखल घेत कोकण रेल्वे प्रशासनाला अखेर झुकवे लागले आणि त्यांनी ऑगस्ट २०२४ मध्ये रेल्वे बोर्डाकडे या थांब्यांचा सकारात्मक तांत्रिक प्रस्ताव पाठवला.
पुढील लक्ष : विलीनीकरण आणि दुहेरीकरण
माहिती अधिकारातून (RTI) प्रशासनाचा बुरखा फाडला. संवादासोबतच संघटनेने हा लढा कागदपत्रांच्या आधारेही मजबूत केला. माहिती अधिकाराचा (RTI) वापर करून संघटनेने सिद्ध केले की, सावंतवाडी स्थानकाचे तब्बल २५ टक्के उत्पन्न (सुमारे ४ लाख २० हजार रुपये प्रतिदिन) हे ५०० किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून येते. एप्रिल २०२६ मध्ये झालेल्या पहिल्या 'महाराष्ट्र रेल्वे परिषदेत मुंबई विभागाचे अध्यक्ष विनोद नाईक यांनी ही आकडेवारी पुराव्यासह मांडून प्रशासकीय दाव्यांमधील हवा काढून घेतली होती.
लोकप्रतिनिधींचा भक्कम पाठपुरावा आणि राजकीय दबाव
या भक्कम तांत्रिक पुराव्यांच्या आधारे लोकप्रतिनिधींनी सरकारवर मोठा राजकीय दबाव निर्माण केला. कल्याण पूर्वेच्या आ. सुलभा गायकवाड यांनी विशेषत्वाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या प्रश्नाचे गांभीर्य पटवून दिले. तसेच खा. डॉ. श्रीकांत शिंदे, खा. नरेश म्हस्के, खा. हेमंत सावरा, खा. अरविंद सावंत, आ. कुमार आयलानी, आ. महेश सावंत, आ. बाळा नर, आ. राजन नाईक यांनी केंद्र व राज्य स्तरावर सातत्यपूर्ण पत्रव्यवहार केला.
स्थानिक पातळीवर खा. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आ. दीपक केसरकर, आ. प्रमोद जठार, आ. माधवी नाईक, आ. निरंजन डावखरे आणि खा. मेधाताई कुलकर्णी यांनीही यासाठी जोरदार पाठपुरावा केला. या सर्व प्रयत्नांची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २५ मार्च २०२६ रोजी रेल्वे मंत्रालयाला आग्रही शिफारस पत्र पाठवले होते. याच पत्राचा संदर्भ देत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ७ जुलै च्या पत्राद्वारे (क्र. 2025/Chg/13/KRCL/16) खालील गाड्यांच्या थांब्यांना अधिकृत मंजुरी दिलीः १. १२१३३/१२१३४ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मंगळुरू एक्सप्रेस. २. १२४३१/१२४३२ तिरुवनंतपुरम सेंट्रल - हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस.
श३. १२२०१/१२२०२ लोकमान्य टिळक टर्मिनस तिरुवनंतपुरम नॉर्थ (कोचुवेली) गरीब रथ एक्सप्रेस या गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. ह्या गाड्यांचा सर्वात मोठा फायदा आगामी येणारा गणेशोत्सव दीपावली उत्सव आणि मे महिन्यात मोठ्या प्रमाणात चाकरमान्यांना होणार आहे. त्यामुळे आता प्रवासी संघटनेचे लक्ष्य रेल्वे टर्मिनस, विलीनीकरण आणि दुहेरीकरण लवकरात लवकर होण्यासाठी लढा सुरूच ठेवणे असणार आहे असे मिहिर मठकर यांनी सांगितले.