

सावंतवाडी : पत्रकार परिषदेत बोलताना रुपेश राऊळ. सोबत चंद्रकांत कासार, मायकल डिसोझा आदी.
सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील एका पर्यटनस्थळावर सुरू असलेला जुगार अड्डा पोलिसांनी तात्काळ उध्वस्त करावा, अन्यथा त्या अड्ड्यावर शिवसेना स्टाईलने कारवाई करू, असा इशारा ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी दिला. परप्रांतीय लोकांकडून हा अड्डा चालवला जात असल्याचा दावा करत याला स्थानिक पोलिस जबाबदार असल्याचा आरोप श्री. राऊळ यांनी केला. त्यांनी जुगार अड्ड्याचा व्हिडिओ पुरावा म्हणून सादर केला.
उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, तालुकाप्रमुख मायकल डिसोझा, विनोद ठाकुर, अशोक धुरी, प्रशांत बुगडे, भिवा गवस आदी उपस्थित होते. श्री.राऊळ म्हणाले, पर्यटनस्थळाची बदनामी होऊ नये म्हणून ठिकाणाचे नाव उघड करत नाही. मात्र, काही परप्रांतीय लोक स्थानिक पोलिसांच्या मदतीने हा अड्डा चालवत आहेत. याबाबत तक्रार आल्यानंतर पोलिस निरीक्षकांनी तात्काळ दखल घेऊन तो बंद पाडला होता. मात्र, पुन्हा सुरू झाल्यास ‘फटके’ देण्याचा इशारा त्यांनी दिला. परजिल्ह्यातील लोक जुगार लावून मस्ती करत असतील तर त्यांना शिवसैनिक सोडणार नाहीत. त्या पर्यटनस्थळावरील व्यवसायिकांनी देखील असे प्रकार खपवून घेऊ नये. अन्यथा, तुमच्यावरही कारवाई होऊ शकते याची दक्षता घ्यावी.
पर्यटनस्थळी पोलिस कर्मचारी असताना हे प्रकार घडतात कसे ? यांना पाठीशी कोण घालतो ? असा सवाल करत परजिल्ह्यातील या लोकांचा वाली कोण ? हा प्रश्न आहे. त्या खोलात न जाता परत असे प्रकार दिसले तर आम्ही तक्रारी करणार नाही. पहिले सगळे उध्वस्त करणार, फटके घालणार, अॅक्शन नंतर पोलिस स्टेशन गाठणार असे श्री. राऊळ यांनी सांगितले.पालकमंत्री नीतेश राणे यांनी अवैध धंदे समोर उच्चाटन करा, असा आदेश दिला आहे,मात्र या प्रकरणाची चौकशी करून पर्यटन स्थळातील अवैध धंद्यांना आशीर्वाद देणार्या संबंधित पोलीस कर्मचार्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
श्री. राऊळ यांनी सावंतवाडी तालुक्यातील वीज समस्येवर नाराजी व्यक्त केली आणि स्थानिक आ. दीपक केसरकर यांच्या दुर्लक्षामुळे ही समस्या असल्याचे सांगितले. वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वारंवार होत असून शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महावितरणच्या कुडाळ येथील अधिकार्यांची भेट घेत अनेक प्रश्न मांडले, त्यावेळी कंत्राटी पद्धतीने वायरमनची भरतीचा निर्णय चुकीचा असल्याचे आपण अधीक्षक अभियंत्यांच्या निर्दशनास आणल्याचे श्री. राऊळ ह यांनी सांगितले.
‘चांदा ते बांदा’ आणि ‘सिंधुरत्न’ योजना बंद करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केसरकरांना चपराक दिली आहे. या योजनेतील कोंबड्या, बकर्या, शेळ्या यांच्या वाटपात प्रचंड भ्रष्टाचार झाला असून याबाबतचा अहवाल मागवणे म्हणजे आ.दीपक केसरकर यांना चपराक असल्याचे ते म्हणाले. भ्रष्टाचार होत असेल तर या योजनेची गरज काय? असा सवाल त्यांनी केला. आजारी बोकड, आजारी गाई देऊन शेतकर्यांची फसवणूक या योजनेमध्ये करण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना ‘सिंधूरत्न’ योजना आणली, मात्र ही योजना यशस्वीपणे राबवण्यास या योजनेचे अध्यक्ष असलेले आ. केसरकर अपयशी ठरल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.