

सावंतवाडी : सावंतवाडी शहर लवकरच पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहे. शहरातील मोती तलावात सुमारे चार कोटी रुपये खर्चून महाराष्ट्रातील सर्वात मोठा म्युझिकल फाऊंटन (संगीत कारंजा) उभारण्यात येत असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या भव्य संगीत कारंज्याची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली असून, शुक्रवारी 16 मे रोजी संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर या कार्याची ट्रायल घेण्यात आली. लवकरच पर्यटकांचे आकर्षण ठरणारा हा संगीत फाउंटन कारंजा नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे.
माजी शिक्षणमंत्री आणि स्थानिक आ.दीपक केसरकर यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे सावंतवाडी शहराला हे अनोखे आकर्षण लाभले आहे. या संगीत कारंजाच्या उद्घाटन समारंभाला े मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. नारायण राणे तसेच पालकमंत्री नीतेश राणे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मोती तलावाच्या सौंदर्यात भर घालणारा हा संगीत कारंजा केवळ पर्यटकांसाठीच नव्हे, तर स्थानिक नागरिकांसाठीही मनोरंजनाचे एक उत्कृष्ट ठिकाण ठरणार आहे. या प्रकल्पाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, कारंजा सुरू झाल्यानंतर पुढील पाच वर्षांपर्यंत त्याची देखभालीची जबाबदारी कंत्राटदारावर असणार आहे. त्यामुळे दीर्घकाळ याची गुणवत्ता टिकून राहील.
गेल्या काही दिवसांपासून मोती तलावात या संगीत कारंज्याची चाचणी घेतली जात आहे आणि ती यशस्वी होताच, भव्य उद्घाटन समारंभाचे आयोजन केले जाईल, असे आ. केसरकर यांनी स्पष्ट केले आहे.