

* तीन-चार दिवसांपूर्वी आत्महत्येचा अंदाज
* मृतदेह कुजल्याने रक्तस्राव; सुरुवातीला खुनाचा संशय
* प्रसाद पडते होते अविवाहित
सावंतवाडी : शहरातील एक परिचित नाव, एक हसतमुख चेहरा आणि यशस्वी व्यावसायिक म्हणून ओळखले जाणारे प्रसाद कोल्ड्रिंक्सचे संचालक, प्रसाद पडते (वय 42) यांनी आपल्या सालईवाडा येथील राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना बुधवारी उघडकीस आली. गेल्या दोन-तीन दिवसांपासून बंद असलेल्या त्यांच्या घरातून बुधवारी सकाळी रक्ताचा प्रवाह बाहेर येत असल्याचे निदर्शनास आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या द़ृश्याने नागरिकांच्या मनात अनेक शंका-कुशंकांनी काहूर माजवले, आणि अखेरीस पोलिसांच्या उपस्थितीत घराचा दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा सत्य समोर आले. प्रसाद पडते यांनी जगाचा निरोप घेतला होता.
गेले दोन दिवस प्रसाद पडते यांचे सालईवाडा येथील घर बंद होते. ते कोणाच्या संपर्कातही नव्हते. बुधवारी सकाळी त्यांच्या घराच्या बंद दरवाजाखालून रक्ताचा ओघळ बाहेर येत असल्याचे शेजार्यांच्या लक्षात आले. हा प्रकार पाहून परिसरातील नागरिक भयभीत झाले आणि त्यांनी तत्काळ सावंतवाडी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय कातिवले, हवालदार महेश जाधव, अनिल धुरी, नीलेश नाईक, सचिन चव्हाण यांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
बंद दाराआडचे गूढ
सुरुवातीला, बंद घरातून रक्त येत असल्याने परिसरात घातपाताची किंवा खुनाची अफवा पसरली होती. नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिसरातील रहिवासी राजू भाट आणि आबा पडते यांच्या मदतीने घराचा दरवाजा तोडला. आत प्रवेश करताच सर्वांना धक्का बसला. प्रसाद पडते यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. मृतदेह कुजण्यास सुरुवात झाल्याने त्यातून रक्तस्त्राव होऊन तो दरवाजाखालून बाहेर आला होता. अंदाजे तीन ते चार दिवसांपूर्वी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
प्रसाद पडते हे सावंतवाडी शहरात ‘प्रसाद कोल्ड्रिंक्स’ या नावाने शीतपेयांचा व्यवसाय करत होते. गेली अनेक वर्षे ते हा व्यवसाय यशस्वीपणे सांभाळत होते. त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांचा मित्रपरिवार आणि ग्राहकवर्गही मोठा होता. मात्र, काही वर्षांपूर्वी त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले होते. प्रसाद हे अविवाहित असल्याने तेव्हापासून ते घरात एकटेच राहत होते.
घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी नगरपरिषदेचे सफाई कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आणि उपस्थित नागरिकांच्या मदतीने प्रसाद यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सावंतवाडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि पडते यांच्या मोबाईल डिटेल्सचीही पाहणी केली जाण्याची शक्यता आहे.
प्रसाद पडते यांच्या आकस्मिक निधनाने सावंतवाडी शहरावर शोककळा पसरली आहे. एक यशस्वी आणि मनमिळाऊ व्यावसायिक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या आत्महत्येच्या वृत्ताने अनेकांना धक्का बसला असून, हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात मोठा मित्रपरिवार आहे.