ST bus Eicher truck accident | साटेली येथे एसटी व आयशर ट्रकची धडक
सावंतवाडी : सातार्डा तर्फ साटेली -देऊळवाडी येथे शनिवारी सकाळी 5.50 वा. च्या सुमारास एसटी आणि आयशर टेम्पो यांच्यात समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात बसमधील काही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. एसटी बस वेंगुर्ले ते पणजी-वास्को जात होती.
वेंगुर्ले आगाराची ही एसटी साटेली-देऊळवाडी स्टॉपजवळ पोहोचली असता, समोरून येणार्या चिरे वाहतुकीच्या आयशर गाडीशी तिची धडक झाली. अपघाता वेळी बसमध्ये 44 प्रवासी होते. यातील 4 प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यात वाहक विठ्ठल जाधव व चालक विजय पवार यांचा समावेश आहे. त्यांना मळेवाड प्रा. आ. केंद्रात दाखल करण्यात आले.
अपघातात दोन्ही वाहनांचे दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मळेवाड प्रा. आ. केंद्रात दाखल केले. सातार्डा दूरक्षेत्राचेे सहा.उपनिरीक्षक श्रीरंग टाकेकर, सुभाष नाईक, कॉन्स्टेबल राहुल बरगे यांनी घटनास्थळी जात तपास सुरू केला.
स्थानिकांनी रस्ता दुतर्फा वाढलेली झाडी या अपघातास कारणीभूत असल्याचे सांगितले. या वाढलेल्या झाडीमुळे वळणावर समोरून येणारे वाहन दिसत नाही आणि त्यामुळे वाहनचालकांना मोठी अडचण निर्माण होते, असा दावा ग्रामस्थांनी केला.

