

दोडामार्ग : साटेली-भेडशी बाजारपेठेतील तीन भाजी दुकाने आगीत भस्मसात झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर भाजीपाला व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
ही आग साटेली-भेडशी येथील बाजारपेठेत, बँक ऑफ इंडिया समोरील खासगी जागेत उभारण्यात आलेल्या तीन झोपडीवजा दुकानांना लागली. ही दुकाने प्लास्टिक पत्रे, बांबू व इतर हलक्या साहित्याच्या मदतीने उभारण्यात आली होती. दुकाने एकमेकांना लागूनच असल्याने आगीत तिन्ही दुकाने पूर्णतः जळून भस्मसात झाली. गेल्या अनेक वर्षांपासून काही भाजी व्यावसायिक बँक ऑफ इंडिया समोरील खासगी जागेत दुकाने थाटून भाजी विक्रीचा व्यवसाय करतात.
आग लागल्याची घटना रविवारी रात्री घडल्यामुळे स्थानिक व्यावसायिक किंवा ग्रामस्थांना काहीच करता आले नाही. सोमवारी सकाळी ही दुर्घटना उघडकीस आली. या आगीत भाजीपाल्याबरोबरच व्यावसायिक वापरासाठी असलेली प्लास्टिक भांडी, वजन काटे, मांडपाचे साहित्य आणि इतर महत्त्वाच्या वस्त जळून खाक झाल्या.
गणेशोत्सव पार्श्वभूमीवर भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करून दुकानांमध्ये साठवणूक करण्यात आली होती. या आगीत सर्व भाजीपाला जळून गेल्याने व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शॉर्टसर्किट, विजेचा स्पार्क की घातपात यावर अद्याप काही ठोस माहिती उपलब्ध झालेली नाही. ही आग कोणी तरी अज्ञात व्यक्तीने जाणूनबुजून लावली असावी, अशी चर्चा सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.