

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील पांडव कालीन देवस्थानसाठी प्रसिद्ध असलेल्या कसईनाथ डोंगराच्या वाघबीळ येथील काही भागात मोठे दगड व माती कोसळल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. यावेळी येथील वन्य पशु-पक्ष्यांनी मोठा आवाज केला. तर परिसरातील ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहे.
तालुक्यातील पर्यटन दृष्ट्या प्रसिद्ध असलेला कसईनाथ डोंगराचा गिरोडे गावाकडील काही भाग रविवारी सायंकाळी कोसळला. यावेळी एकच मोठा आवाज झाला. हा आवाज ग्रामस्थांनी ऐकल्याचे त्यांचे म्हणणे आहे. घटनेनंतर जंगली प्राणी, माकड, मोर हे मोठमोठ्याने ओरडत होते. मात्र सायंकाळ झाल्याने तेथे जाऊन पाहणे ग्रामस्थांना शक्य नव्हते,असे गिरोडे गावातील ग्रामस्थांनी सांगितले.
कोसळलेल्या भागामुळे कोणतेही नुकसान झाले नसले तरी भविष्यात या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लगतच्या गावातील ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत.