

Goa Acid Attack
दोडामार्ग : गोव्यातील धारगळ-सुकेकुळण येथे सोमवारी सकाळी एका विद्यार्थीवर झालेल्या धक्कादायक अॅसिड हल्ल्याचे कनेक्शन दोडामार्ग तालुक्याशी असल्याचा गोवा पोलिसांचा प्राथमिक अंदाज खरा ठरला आहे. या प्रकरणी नीलेश गजानन देसाई (रा. डबीवाडी, कळणे) या संशयिताला गोवा पोलिसांनी अटक केली आहे.
या हल्ल्यात ऋषभ उमेश शेट्ये (17) हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. ऋषभ हा म्हापसा येथील उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत असून सोमवारी सकाळी धारगळ-सुकेकुळण येथील बसस्टॉपवर तो कॉलेजला जाण्यासाठी थांबला होता. याच दरम्यान, दुचाकीवरून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर अॅसिड फेकले आणि पलायन केला. यात गंभीर जखमी ऋषभला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटने बाबत गोवा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, ऋषभ शेटये हा म्हापसा येथील सारस्वत कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. रोजच्या प्रमाणे त्याचे वडील उमेश शेटये यांनी त्याला कॉलेजला जाण्यासाठी धारगळ-सुकेकुळण बस स्टॉपवर सोडले आणि ते माघारी परतले. ऋषभ हा बसस्टॉपवर एकटाच उभा होता. काही वेळाने एक युवक स्कुटरने तेथे आला. त्याने अंगात काळ्या रंगाचा रेनकोट, हॅन्ड ग्लोव्हज व गाडीच्या समोर एक सफेद रंगाची बकेट होती. त्यामध्ये केमिकलयुक्त द्रव पदार्थाची बॉटल होती. दुचाकीवरील युवकाने बॉटल केमिकल बकेटमध्ये ओतून तेथे उभ्या असलेल्या ऋषभच्या चेहर्यावर फेकून त्याने तेथून पळ काढला. त्यात ऋषभचा चेहरा व शरिराचा काही भाग जळाला. त्या वेदनेने विव्हळत पडलेला ऋषभ मदतीसाठी आरडा-ओरडा करू लागला.
जखमी अवस्थेत ऋषभ पळत 50 मीटर दूरवर गेला असता तेथे एका नागरिकाने त्याला पाहिले व आपल्या वाहनाने म्हापसा रुग्णालयात दाखल केले. तेथून त्याला बांबोळी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. ही घटना सर्वत्र पसरताच एकाच खळबळ उडाली. ही बातमी पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन तपासाची सूत्रे वेगाने हलविली. हल्लेखोरांचा छडा लावण्यासाठी पोलिस यंत्रणेने लागलीच फिल्डिंग लावली.
गोवा पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. या हल्ल्यामागे पूर्वीच्या एका गंभीर घटनेचा सूड असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. यानुसार त्यांनी दोडामार्ग पोलीस ठाण्याशी संपर्क साधून संशयिताविषयी माहिती घेतली. तपासादरम्यान नीलेश देसाई याच्यावर संशय बळावल्याने त्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी मोर्चेबांधणी केली. अखेर सायं. 5 वा. च्या सुमारास करासवाडा, गोवा येथून नीलेश देसाई याला ताब्यात घेण्यात आले. सध्या त्याची कसून चौकशी सुरू आहे.
संशयित नीलेश देसाई यांचे गावातच हार्डवेअरचे दुकान आहे. सुडापोटी त्यांनी हा हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र हे अॅसिड संशयिताला कोठे मिळाले असावे? दुकानातून खरेदी केले असेल तर दुकानदाराने त्याला हे अॅसिड विनापरवाना कसे दिले? असे सवाल आता उपस्थित होवू लागले आहेत.