

मळगाव : गेले आठ दिवस सतत कोसळणार्या पावसामुळे समुद्र खवळलेला आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील मच्छीमारांनी मच्छीमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असा इशारा बंदर विभागाने दिला.
मोसमी वार्याचा वेग वाढल्यामुळे अरबी समुद्राच्या किनारी भागात गेले आठ दिवस सतत पाऊस कोसळत आहे. संततदार पावसामुळे अरबी समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे समुद्र खवळलेले स्थितीत आहे. वेंगुर्ले तालुक्याला रेडीपासून निवती कोचर्यापर्यंत लाभलेल्या किनारपट्टीवर छोट्या मोठ्या मच्छीमारी नौकाच्या साह्याने मच्छिमार मासेमारी करतात. मात्र समुद्र खवळलेला असल्याने स्थानिक मच्छीमार्याने मच्छीमारीसाठी समुद्रात जाऊ नये असा इशारा बंदर विभागाने दिला आहे.
पावसाचा जोर वाढत असल्यामुळे समुद्र खवळलेल्या स्थितीत आहे. तालुक्याच्या किनारपट्टी भागावर खवळलेल्या समुद्राच्या मोठमोठया लाटा येऊन आदळत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी किनाापट्टी खचत आहे. परिणामी किनारपट्टीवर समुद्र कनारी अतिशय खोलगट बनल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, वेंगुर्ले बंदर व सागरेश्वर किनार्यावर पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी होताना दिसते. हे पर्यटक उत्साहाच्या भरात समुद्राच्या पाण्यात जाण्याचा प्रयत्न करतात. खवळलेल्या समुद्राच्या किनार्यावर आढळणार्या अजस्त्र लाटा समुद्रात खेचून घेण्याची भीती असते. त्यामुळे पर्यटकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन यंत्रणेकडून करण्यात आले आहे.