

सावंतवाडी ः सिंधुदुर्ग उपवनसंरक्षकपदी मिलिश शर्मा यांची नियुक्ती झाली असून त्यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. यापूर्वी ते गडचिरोली येथे कार्यरत होते, जिथे त्यांनी 34 जंगली हत्तींचे व्यवस्थापन केले आहे. त्यामुळे दोडामार्ग भागातील सात हत्तींचा बंदोबस्त निश्चितच करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांची बदली चंद्रपूर-सिरोंचा येथे झाली असून त्यांच्या जागी मिलीश शर्मा यांची नियुक्ती झाली आहे. सन 2022 मध्ये ते वनविभागात रुजू झाले आहेत. दोडामार्गवासीय हत्तींना हटवण्यासाठी आग्रही आहेत आणि यासंदर्भात नुकतीच एक बैठक झाली, मात्र ठोस निर्णय अद्याप झालेला नाही. शर्मा म्हणाले,
सिंधुदुर्गमधील दोडामार्ग येथे पूर्वी तीन टस्कर नर हत्ती होते, आता दोन टस्कर आणि पाच हत्तींचा कळप आहे. आपण आजच पदभार स्वीकारला असून लवकरच घटनास्थळी जाऊन पाहणी करू. हत्तींच्या उपद्रवाबाबत योग्य उपाययोजना करून त्याचा अहवाल शासनाला सादर करू. हत्ती पकड मोहिमेबद्दल ते म्हणाले, हत्ती हा अत्यंत हुशार वन्यप्राणी आहे आणि त्याचे मार्ग अनेक असल्याने त्याला सहज पकडणे कठीण आहे. या जंगल भागाचा अभ्यास करून हत्ती संरक्षित क्षेत्राबाबत आणि या क्षेत्राला पर्यटनदृष्ट्या विकसित करण्याबाबत स्थानिक शेतकरी व लोकप्रतिनिधींशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. सहा. वनसंरक्षक वैभव बोराटे, डॉ. सुनील लाड, सावंतवाडी वनक्षेत्रपाल सुहास पाटील, कार्यालयीन अधिकारी श्री.कांबळे, सत्यजीत सावंत, कुशल वेल्हाळ आणि वनपाल यांनी त्यांचे अभिनंदन केले.