Former MLA Statement | आम्ही माजी आमदार, आमचे कार्यक्षेत्र राज्यभर!
सावंतवाडी : वेंगुर्ले तालुक्यातील दाभोळी येथील जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरून ठाकरे शिवसेनेत निर्माण झालेल्या अंतर्गत वादंगावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार तथा शिवसेनेचे नेते परशुराम उपरकर यांनी शुक्रवारी जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी आणि त्यांच्या सहकार्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. आम्ही माजी आमदार आहोत, त्यामुळे आमचे कार्य क्षेत्र संपूर्ण राज्यभर आहे. सर्व सामान्य जनतेवर अन्याय झाल्यास आम्ही राज्यात कुठेही जाऊन संबधित यंत्रणेला जाब विचारू शकतो, आम्हाला कोणी थांबवू शकत नाही, अशा शब्दांत उपरकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
पर्णकुटी विश्रामगृहावर आयोजित या पत्रकार परिषदेला आशिष सुभेदार, आदेश सावंत, नाना सावंत, अशोक परब, आबा चिपकर, रमेश शेळके, मनोज कांबळी, संदेश सावंत, मंदार नाईक, सुरेंद्र कोठावळे, शरद हळदणकर आदी उपस्थित होते. दाभोळी प्रकरणावरून ठाकरे शिवसेनेत निर्माण झालेल्या वादावर स्पष्टीकरण देताना उपरकर म्हणाले, दाभोळी येथे मी, माजी आमदार वैभव नाईक आणि सतीश सावंत हे तिघे एका शेतकर्याची तक्रार आल्याने गेलो होतो. कंपनीने आपल्या जमिनी कवडीमोल दराने घेतल्याची त्यांची तक्रार होती. त्यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही तिथे गेलो. त्या लोकांवर अन्याय झाला आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आम्ही केली.
त्यानुसार पुढील प्रक्रिया झाली. मात्र, आमच्याच पक्षातील काही लोकांनी आम्ही संघटनेत लूडबूड करत असल्याचा आरोप केला. वस्तुस्थिती लक्षात घेता, स्थानिक शेतकर्यावर अन्याय झाल्यानेच आम्ही या प्रकरणात लक्ष घातले. आम्ही दोघेही (मी आणि वैभव नाईक) माजी आमदार आहोत, त्यामुळे आम्हांला राज्यात कुठेही काम करण्याची परवानगी आहे. त्यामुळे कोणी आमचे कार्यक्षेत्र ठरवू नये, असे उपरकर यांनी ठणकावले.
सासोली आणि पिंगुळीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणात लक्ष घालणार
यापुढे आपण दोडामार्ग येथील सासोली आणि कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणातही लक्ष घालणार असल्याचे श्री. उपरकर यांनी जाहीर केले. या संदर्भात कोणाच्या तक्रारी असतील तर त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन करत लवकरच संबंधित गावांना आपण, वैभव नाईक आणि सतीश सावंत भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
थेट प्रसिद्धी माध्यमांसमोर जाणे चुकीचे
आमच्या विरोधात त्यांच्या काही तक्रारी असतील तर त्यांनी थेट माध्यमांसमोर जाण्याऐवजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कळवायला हवे होते, सावंतवाडीतील प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरणात आम्ही सगळे एकत्र होतो. त्यावेळी ते आमच्याशी बोलू शकले असते. आमची काही चूक झाली असे वाटले असते तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे त्यांनी तक्रार केली असती, तरी चालले असते. परंतु त्यांनी थेट प्रसिद्धी माध्यमांसमोर जाऊन घेतलेली भूमिका ही चुकीची आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा बँकेची नाबार्डकडे तक्रार करणार
यावेळी त्यांनी जिल्हा बँकेच्या कार्यपद्धतीवरही टीका केली. शेतकर्यांची बँक अशी ओळख असलेल्या या बँकेतून जमीन खरेदी-विक्रीसाठी कर्ज देण्यात आले आहेत. एका परप्रांतीयाच्या नावे सात ते आठ कोटींचे कर्ज देण्यात आले आहे. हा सर्व प्रकार म्हणजे शेतकर्यांचे पैसे बुडवण्यासारखा आहे, असा आरोप करत या विरोधात नाबार्ड आणि वरिष्ठ स्तरावर तक्रारी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईतील दलालाकडून जिल्ह्यात कवडीमोल भावाने जमीन खरेदी
श्री. उपरकर म्हणाले, मुंबईतील एका दलालाकडून जिल्ह्यात सामान्य लोकांच्या जमिनी कवडीमोल भावाने खरेदी केल्या जात आहेत. या जमीन खरेदी-विक्री व्यवहारात जिल्ह्यातील एका डॉक्टरसह काही सत्ताधारी नेत्यांची पार्टनरशिप आहे. विशेष म्हणजे, यासाठी या जमीन खरेदीसाठी जिल्हा बँकेने चुकीच्या पद्धतीने कर्ज दिले आहे, असे आरोप करत श्री. उपरकर यांनी या सर्व प्रकरणांची लवकरच आपण योग्य यंत्रणांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.

