

कुडाळ : पणजी ते सोलापूर जाणार्या एसटी बसला आकेरी मेट येथील उतारावर अपघात झाला. समोरून येणारर्या ट्रकला बाजू देण्यासाठी एसटी चालकाने बस रस्त्यालगत घेण्याचा प्रयत्न केला असता बस स्लीप होऊन रस्त्यालगत कलंडली. मात्र सुदैवाने कलंडलेली बस झाडाला अडकल्याने मोठी दुर्घटना टळली. ही घटना शनिवारी सकाळी 8.45 वा. च्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. प्रवाशांना पर्यायी बसने मार्गस्थ करण्यात आले.
शनिवारी सकाळी सांगोल आगाराची पणजी- सोलापूर बस सावंतवाडीस्थानकातून निघाली. ती कुडाळकडे येत असताना आकेरी मेट येथे समोरून येणारा ट्रक एसटीला धडकेल या भीतीने एसटी चालकाने एसटी रस्त्यालगत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र बस स्लीप झाल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्यालगत कलंडली. परंतु ही बस तेथील झाडाला अडकल्याने पलटी होण्यापासून बालंबाल बचावली. या बसमधून सुमारे 29 प्रवाशी आणि चालक - वाहक प्रवास करीत होते. बसला अपघात होत असल्याचे लक्षात येताच बसमधील प्रवाशांनी भीतीन आरडाओरडा केला.
मात्र, बस झाडाला अडकल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. बसमधील प्रवाशांना दुसर्या बसने कोल्हापूर, सोलापूरला पुढे मार्गस्थ करण्यात आले. दुपारी क्रेनच्या सहायाने अपघातग्रस्त बस बाहेर काढण्यात आली. अपघाताची माहिती मिळताच कुडाळ आगाराच्या सहा. वाहतूक निरीक्षक पल्लवी बर्वे, वाहतूक नियंत्रक श्री.बावदाणे यांनी अपघातस्थळी भेट दिली.