

कुडाळ : पुढारी वृत्तसेवा
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले दहा-बारा दिवस परतीचा पाऊस धो-धो कोसळत आहे. सतत कोसळत असलेल्या अवकाळी पावसाचा भातपिकाला प्रचंड प्रमाणात फटका बसला आहे. जमीनदोस्त झालेले भातपीक पाण्यात कुजले आहे, तर बर्याच ठिकाणी भाताला कोंब फुटू लागले आहेत. भाताचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाच्या अवकृपेने हिरावला आहे. त्यामुळे चिंतेत सापडलेल्या शेतकर्यांना आता आम्ही खायचे काय, असा प्रश्न पडला आहे. शासन आमच्या नुकसानीकडे कधी गांभीर्याने लक्ष देणार?, आम्हाला तुटपुंजी नुकसानभरपाई नको तर ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. नवरात्रौत्सवापासून सुरू झालेल्या पावसाचा जोर अजूनही कायम आहे. गेले पाच- सहा दिवस तर दुपारनंतर विजांचा गडगडाट आणि लखलखाटासह जोरदार वादळी पाऊस कोसळत आहे. सकाळच्या सत्रात ऊन तर संध्याकाळच्या सत्रात मुसळधार पाऊस व रात्रभर विजांचा गडगडाट आणि लखलखाट असे काहीसे वातावरण जिल्ह्यात आहे.
या पावसाच्या तडाख्यात भातपीक जमीनदोस्त होऊन कुजल्याने शेतकरी धास्तावले आहेत. जून-जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात झालेली अतिवृष्टी, चार ते पाचवेळा आलेला पूर यात भातरोप (तरवा) आणि लावणी वाहून तसेच कुजून गेली होती. त्यावेळी शेतकर्यांवर दुबार पेरणी व लावणीचे संकट ओढवले होते. त्यानंतर उरली सुरली भात शेती बहरून आता कापणीयोग्य बनली. दसरोत्सव आटोपताच भात कापणीस सुरूवात करण्याची तयारी शेतकर्यांनी केली होती. मात्र नवरात्रोत्सवात सुरू झालेला पा ऊस थांगण्यास तयार नाही, उलट पावसाचा कहर वाढत आहे. यामुळे उभे भातपीक शेतातच जमीनदोस्त झाले आहे. सततच्या पावसामुळे पाण्यात राहिलेले भात अक्षरशः कुजून गेले तर बर्याच ठिकाणी भाताला लोंब्यावरच कोंब आले आहेत. केल्याने शेतकरी पुरता हवालदील झाला आहे. भात बियाण्यांची किंमत, पेरणी, नांगरणी, लावणी व कापणीसाठी होणारा मजुरीचा खर्च, खत यासाठी झालेला खर्च पाहता हा खर्च ही भातशेतीतून निघेल की नाही अशी परिस्थिती आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास आम्ही आता खायचे काय? असा प्रश्न शेतकर्यांसमोर आहे. एकीकडे शासन विविध योजनांची खैरात करीत आहे तर दुसरीकडे शेतकर्यांच्या या बिकट अवस्थेकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन, सरसकट भरीव नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकर्यांमधून केली जात आहे.
भातशेती अलिकडे अतिवृष्टी, पूर, अवकाळी पाऊस आणि वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे धोक्यात आली आहे. गवे, वनगाई, डुक्कर, माकड या वन्य प्राण्यांकडून शेती व पिकाची नासधूस अलिकडच्या काळात वाढली आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांकडून शेतीची नुकसानी होत असतानाच त्यात अवकाळी पावसामुळे दुहेरी नुकसानी होत आहे.