सावंतवाडी : विश्वनाथ नाईक
राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या सिंधुदुर्ग विभागाने एप्रिल ते सप्टेंबर- २०२४ या सहा महिन्यांच्या कालावधीत अवैध दारू वाहतूक व विक्रीविरोधात धडक कारवाई करत तब्बल ४ कोटी १६ लाख ५ हजार २२५ रुपयांची गोवा बनावटीची दारू व मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. यामध्ये एकूण ३१२ प्रकरणांमध्ये ३१ वाहने ताब्यात घेतली असून २७८ संशयितांना अटक करत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. गत वर्षी २०२३ मध्ये याच कालावधीत ३ कोटी ९१ लाख ६५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. यावर्षी २४ लाख ३९ हजार ६२५ रुपयांचा मुद्देमाल अधिक पकडला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभाग सिंधुदुर्गने अनेक ठिकाणी छापे टाकत गोवा दारूच्या अवैध वाहतुकीविरोधात मोहीम हाती घेतली आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून करवाई करताना चकवा देऊन पळणाऱ्या वाहनचालकांचा पाठलाग केला. महाराष्ट्रातील दारू किंमतीच्या तुलनेत गोव्यामधील दारू स्वस्त असल्याने सिंधुदुर्गमार्गे अनेक ठिकाणी बेकायदा दारू वाहतूक होते. मात्र सिंधुदुर्ग उत्पादन शुल्क विभाग सतर्क असल्याने या चोरट्या दारू वाहतुकीला बराच आळा बसला आहे. गेल्या सहा महिन्यांत गोवा दारू असलेल्या मुद्देमालात वारस २८०, तर बेवारस ३२ अशा एकूण ३१२ कारवाया करण्यात आल्या. यात २७८ संशयित आरोपींसह ३१ वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत.
एप्रिल महिन्यात ३७ लाख ७६ हजार ६२० रुपये, मे महिन्यात १५ लाख १४ हजार ४२५ रुपये, जुन महिन्यात २३ लाख ५७ हजार ६७० रुपये, जुलै महिन्यात १ कोटी ७३ लाख २१ हजार १७० रुपये, ऑगस्ट महिन्यात ९४ लाख ३ हजार ५६० रुपये आणि सप्टेंबर महिन्यात ७२ लाख ३१ हजार ७८० रुपयांचा गोवा दारूसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सर्वाधिक जास्त मुद्देमाल जुलै महिन्यात जप्त करण्यात आला.
राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली पथक या बेकायदा दारू वाहतुकीवर करडी नजर ठेवून आहे. शासनाचा महसूल बुडविणाऱ्यांविरोधात कडक मोहीम राबविण्यात येत आहे. यापुढेही अशीच कारवाई सातत्याने करण्यात येणार आहे.
प्रदीप रासकर, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, इन्सुली नाका