

सिंधुदुर्ग :सावंतवाडी आणि वेंगुर्ले येथे भाजपने मोठा विजय मिळवितानाच कणकवली येथील होम पीचवर निसटता पराभव झाल्यामुळे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री, तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे नाराज झाल्याची माहिती आहे. या निकालानंतर जनतेने दिलेला कौल आपण स्वीकारत आहोत, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली. त्यानंतर मात्र एक एक्स पोस्ट करत अप्रत्यक्षरीत्या नाराजी व्यक्त केली आहे. या पोस्टमुळे मंत्री नितेश राणे काय बोलणार, याची उत्सुकता महाराष्ट्राच्या राजकारणात लागून राहिली आहे.
‘गप्प होतो... पक्षाच्या, माझ्या नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी..., पण काही गोष्टी बोलल्या नाही, तर खऱ्या वाटायला लागतात... पण आता ती वेळ आली आहे’, अशी ही पोस्ट आहे. मंत्री नितेश राणे यांनी अशी पोस्ट केल्यानंतर कोकणच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ते आपल्या पक्षातील लोकांबाबत बोलणार की, मित्रपक्ष शिंदे शिवसेनेतील नेत्यांबाबत बोलणार याबाबत वेगवेगळे तर्क वितर्क केले जात आहेत; मात्र या पोस्टमधून त्यांची नाराजी उघड झाली आहे.
सन 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीपासून मंत्री नितेश राणे प्रत्येक निवडणूक जिंकत आले आहेत. सन 2017 सालची कणकवली नगरपंचायत निवडणूक त्यांनी संयमाने लढवून आपले पॅनेल विजयी केले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय संपादन केला आणि पहिल्या टप्प्यातच त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. गेले वर्षभरात त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आणि महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसायमंत्री म्हणून प्रभावीपणे काम केले. आताच झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शतप्रतिशत भाजप हे उद्दिष्ठ ठेवून स्वबळावर निवडणुका लढण्याची भूमिका त्यांनी घेतली. त्यासाठी खूप मेहनतही घेतली. सावंतवाडी, वेंगुर्ले या दोन नगरपालिकांमध्ये भाजपला अपेक्षेनुसार मोठा विजयही मिळाला आहे.
खरेतर कणकवली नगरपंचायत
हे तर त्यांचे ‘होमपीच’. हे शहर जिंकण्यासाठी त्यांनी पूर्वीपासुनच तयारी केली होती. भाजपच्या विरोधात शहर विकास आघाडी अस्तित्वात आली. विशेष म्हणजे या आघाडीत भाजप विरोधातील सर्व पक्षीयांबरोबरच भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिंदे शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. एवढेच नव्हे तर मंत्री राणे यांचे ज्येष्ठ बंधु व शिवसेनेचे कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार असलेले निलेश राणे हे कणकवलीत भाजपच्या विरोधात प्रचाराला उतरले होते. निवडणुकीत पैसे वाटपाचा थेट आरोप आ. निलेश राणे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्यावर केला होता. परंतु नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान विधिमंडळाच्या प्रांगणात आ. रवींद्र चव्हाण आणि आ. निलेश राणे यांनी एकमेकांची भेट घेवून तो वाद संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला होता. खरेतर मंत्री नीतेश राणे यांच्यासाठी कणकवली नगरपंचायत निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने त्यांनी या शहरात प्रचारामध्ये कोणतीही कसर सोडली नव्हती. तरीही भाजपचे उमेदवार समीर नलावडे यांचा निसटता पराभव झाला. नलावडे यांचा निसटता पराभव असला तरी तो महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभाव वाढत चाललेल्या मंत्री नीतेश राणेंना धक्का देणारा होता.
निकालानंतर दुपारी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये कणकवलीत दिलेला जनतेचा कौल आपण स्वीकारल्याचे त्यांनी जाहीर केले. त्याचवेळी आ. निलेश राणे यांनी कणकवलीत प्रचार केला म्हणून शहर विकास आघाडीचा विजय झाला असेही मत व्यक्त केले. त्यानंतर ते संध्याकाळी मुंबईला गेले. तोवर आ. निलेश राणे मालवणात विजय मिळविल्यानंतर शिवसेनेच्या विजयी रॅलीमध्ये सहभागी झाले. त्या वेळी त्यांनी आज आपल्या ‘एका डोळ्यात आनंदाश्रू आणि दुसऱ्या डोळ्यात दु:खाश्रू असल्याच्या भावना व्यक्त केल्या’. मालवणचा विजय असला तरी कणकवलीत पराभूत झालेले भाजपचे कार्यकर्ते हे आपलेच कार्यकर्ते आहेत अशी भूमिकाही त्यांनी मांडली. मंत्री नीतेश राणे यांनी या विजयाबद्दल आ. निलेश राणे यांचे जाहीर अभिनंदनही केले आहे.
नेमकी नाराजी कुणावर?
कणकवलीत झालेला पराभव हा कुणामुळे झाला? कशामुळे झाला? याची चर्चा भाजप गोटात सुरू आहेच. त्याशिवाय या निकालाबाबत मंत्री नितेश राणे यांच्या मनात काय चालले आहे, हे एक्स पोस्टनंतर लवकरच उघड होईल, अशी शक्यता आहे. एक्स पोस्टमध्ये दिलेल्या मजकुरानुसार, ‘आजवर पक्ष, नेता आणि कुटुंब यांच्या प्रतिमेसाठी आपण गप्प राहिल्याचे मंत्री नितेश राणे यांचे म्हणणे आहे’. याचा अर्थ गेल्या काही दिवसांत झालेल्या अंतर्गत घडामोडींबाबत ते बोलू शकतात, अशी चर्चा आहे. त्यांचा नेमका रोष कोणावर आहे, हेही त्यांच्याकडून स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच मंत्री नितेश राणे यांच्या यापुढील वक्तव्यांकडे कोकण आणि महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.