

गणेश जेठे
शाळकरी मुलांनी घर आणि परिसरातला कचरा उचलला हीच केवढी मोठी गोष्ट आहे. इथेच तर देशभक्ती रुजते. स्वच्छता हाच विकास आहे. म्हणूनच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी स्वत: सिंधुदुर्ग जिल्हा प्लास्टिक मुक्त मोहीम हाती घेतली. ती संपूर्णपणे मेहनत घेऊन राबवली. देशाचे भावी नागरिक असलेल्या शाळकरी मुलांना कचरा गोळा करण्याची संधी दिली. हा हा म्हणता तब्बल 5 917 किलो म्हणजेच जवळपास 6 टन कचरा गोळा झाला आहे. आता हा कचरा सांगली येथील शिवप्रतिज्ञा सेवाभावी संस्था गोळा करत असून हा कचरा जिल्ह्याबाहेर जाणार आहे, हेच या मिशनचे सर्वात मोठे यश आहे.
केवळ शासनाचाच आलेला उपक्रम राबवून पुढे जाण्याची मानसिकता बहुतांश अधिकार्यांची असते. सीईओ खेबुडकर यांनी मात्र त्या पलिकडे जाऊन विचार केला. नाहीतरी ते सध्या जिल्हा परिषदेचे प्रशासक आहेत. ही जबाबदारी ओळखून पर्यटन जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात जर समृद्धी निर्माण करावयाची असेल तर स्वच्छता असायला हवी. सिंधुदुर्ग जिल्हा हा तसा इतर जिल्ह्यांच्या तुलनेत स्वच्छ जिल्हा. परंतु रस्त्याच्या दुतर्फा आणि समुद्र किनार्यांवर कचरा दिसतो त्यामुळे पर्यटक नाराज होतात. अर्थात हा कचरा पर्यटकच टाकतात. त्याशिवाय स्वच्छ सिंधुदुर्ग म्हणून जाहीर झालेल्या या जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्लास्टिक कचरा मात्र मोठ्या प्रमाणात पडलेला आहे.
आजवर अनेक सेवाभावी संस्थांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वच्छता मोहिमा राबविल्या. परंतु गोळा केलेला कचरा टाकायचा कुठे, त्याची विल्हेवाट कशी लावायची हा मार्ग सापडत नव्हता. जिल्हा परिषदेकडून प्रक्रिया युनिट उभारली जात आहेत, परंतु ती अजूनही प्रभावीपणे सुरू झालेली नाहीत. त्यामुळे साठवलेल्या कचर्याचा प्रश्न मिटला नव्हता. आता मात्र रवींद्र खेबुडकर यांनी पुढाकार घेतला आहे. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हाच प्लास्टिक मुक्त करण्याचे मिशन त्यांनी सुरू केले आहे. त्यासाठी प्लास्टिक व ई वेस्ट संकलन स्पर्धा त्यांनी आखली. त्यासाठी पहिल्या टप्प्यात शाळांना सहभागी करून घेतले. शाळकरी मुलांनी आजुबाजुचा प्लास्टिक आणि ई वेस्ट कचरा गोळा करावा आणि तो शाळेत आणून जमा करावा अशी ही स्पर्धा. कचरा संकलनाचे प्रमाण, स्वच्छता, विद्यार्थ्यांचा सहभाग सृजनशिलता यावर आधारीत निकष आखण्यात आले आणि त्याचे मुल्यांकन करण्यात येत आहे.
स्पर्धा जाहीर होताच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे अधिकारी, शिक्षक कंबर कसून कामाला लागले. शाळा शाळांमध्ये कचरा संकलनाच्या स्पर्धा सुरू झाल्या. तब्बल 632 शाळांनी सहभाग घेतला. सर्वात जास्त मालवण तालुक्यातील शाळांनी कचरा गोळा केला. तब्बल 3 हजार किलो कचरा मालवण तालुक्यातील 160 शाळांनी गोळा केला. 15 ते 20 नोव्हेंबर या काळातच ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि या सहा दिवसांत इतका मोठा कचरा गोळा झाला. आता सहभाग घेतलेल्या शाळांच्या कामांचे मुल्यांकन सुरू झाले आहे. यामध्ये प्राथमिक शाळांसाठी 8 उत्कृष्ट शाळा बक्षीसे आणि पूर्ण प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी 8 उत्कृष्ट शाळा बक्षीसे देण्यात येणार आहेत.
शाळकरी मुलांनी आपले घर आणि परिसरातील कचरा गोळा केला आहे. इतक्या लहान वयात मुलांना सार्वजनिक ठिकाणी कचरा न फेकण्याची सवय लागेल हेही या मिशनचे मोठे यश म्हणावे लागेल. पाण्याच्या व ज्युसच्या रिकाम्या बाटल्या, आईस्क्रीमचे कप, रिकामे कंटेनर, प्लास्टिक डबे, प्लास्टिक कॅरीबॅग, ई-वेस्ट, खराब हेडफोन, खराब वायर, खराब बॅटरी सेल, बंद पडलेले मोबाईल फोन, खराब एलईडी बल्ब तसेच खराब झालेली इलेक्ट्रिक वायर व उपकरणे मुलांनी गोळा केली आहेत. हा सर्व कचरा जिल्ह्याबाहेर विशेषत: सांगली येथे नेण्यात येणार आहे.
कचरा शाळांकडे गोळा झाला आहे. शाळांमधून तो गावच्या ठिकाणी गोळा होईल आणि शिवप्रतिज्ञा सेवाभावी संस्था तो गोळा करत आहे. ही संस्था सांगली जिल्ह्यातील मीरज येथील असून त्याचे प्रमुख वसंत चौगुले हे आहेत. वसंत चौगुले हे पर्यावरण क्षेत्रामध्ये काम करतात. त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आम्ही हा कचरा उचलण्यास सुरुवात केली आहे. हा कचरा जिल्ह्याबाहेर नेवून त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. या प्लास्टिक कचर्याचा पुर्नवापर होणार आहे. त्यामुळे पर्यावरण रक्षण होईलच, त्याशिवाय सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असून तो आणखी स्वच्छ होईल. मुंबई-गोवा महामार्ग आणि इतर मोठ्या रस्त्यांच्या दुतर्फा असलेला प्लास्टिक कचराही उचलण्याचे आम्ही नियोजन करत आहोत, असेही चौगुले म्हणाले.