चिपळूण : राज्यभरात कोट्यवधी रूपयांचा गंडा घालणाऱ्या टीडब्ल्यूजे कंपनी विरोधात आता गुंतवणूकदार एकवटत आहेत. कंपनीच्या 11 हजार गुंतवणूकदारांमध्ये जिल्ह्यासह राज्यातील 1 हजार 600 हून अधिक पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांनी टीडब्ल्यूजेमध्ये गुंतवणूक केल्याचे या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक असलेले समीर नार्वेकर हे सांगत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला.
मध्यंतरी टीडब्ल्यूजेचे व्यवस्थापकीय संचालक समीर नार्वेकर व एक भागीदार संकेश घाग यांना हाणामारी झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या नंतर आता नवा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. मात्र, आता या कंपनीत पोलिसांनीच मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याचे समोर आले असून स्वतः नार्वेकर हा यामध्ये हे वक्तव्य करीत आहे. त्यामुळे जिल्हा पोलिसांसह पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
गुंतवणुकीवर 3 ते 7 टक्के व्याजाने परतावा देण्याचे आमिष दाखवून टीडब्ल्यूजे कंपनीने कोट्यवधी रूपयांची माया गोळा केली. गेल्या आठ महिन्यांपासून गुंतवणूकदारांना कुठलाच परतावा मिळत नसल्याने ठिक़ठिक़ाणी समीर नार्वेकर, संकेश घाग व अन्य 21 जणांवर आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. पुणे, ठाणे, यवतमाळ, चिपळूण, रत्नागिरी या ठिकाणी अनेक गुन्हे दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार आर्थिक खाईत लोटले गेले आहेत. दोन दिवसांपूर्वी चिपळूण पोलिस ठाण्यात संचालकांना अटक़ होत नाही या विरोधात अनेक गुंतवणूकदारांनी चिपळूण पोलिसांना घेराव घातला. 31 डिसेंबरपर्यंत अटक न झाल्यास पोलीस ठाण्यासमोर आत्मदहन करू, असा इशारा दिला.