

सिंधुदुर्ग : “सिंधु दर्पण पत्रकार गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून ओरोस येथे पत्रकारांना हक्काची घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत या भूखंडाचे हस्तांतरण होईल, अशी घोषणा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मंगळवारी सिंधुदुर्गनगरी येथे केली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास एक उंचीवर न्यायाचा आहे त्यासाठी जिल्ह्यातील पत्रकारांनी साथ द्यावी असे आवाहनही ना.राणे यांनी केले. अनेक पत्रकार घरांसाठी आग्रही होते. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून, लवकरच या गृहनिर्माण प्रकल्पाला सुरुवात होईल आणि हक्काच्या घराच्या चाव्या पत्रकारांच्या हातात असतील. जिल्हा पत्रकार भवन ज्याप्रमाणे एक आदर्श ठरले, तसेच हा गृहनिर्माण प्रकल्पही आदर्श ठरेल.“असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सिंधुदुर्गनगरी येथील पत्रकार भवनामध्ये पत्रकार दिन सोहळ्यात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात पत्रकारांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्याप्रमाणे नारायण राणे साहेबांनी जिल्ह्याचा भक्कम पाया रचला, त्याच धर्तीवर जिल्ह्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी आणि दरडोई उत्पन्नात वाढ करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. या प्रवासात पत्रकारांनी मार्गदर्शक आणि टीकाकार अशा दोन्ही भूमिकांतून साथ द्यावी,“ असे आवाहन राज्याचे मत्स्यव्यवसाय, बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केले.
अवैध धंद्यांविरोधात रोखठोक भूमिका
जिल्ह्यातील तरुण पिढीला बरबाद करणाऱ्या अवैध धंद्यांवर प्रहार करताना ना. नितेश राणे म्हणाले, “राणे साहेबांनी मला पालकमंत्री पद स्वीकारताना पहिले काम जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याचे दिले होते. काही जण म्हणतात यामुळे मला निवडणुकीत फटका बसला, पण मी त्याची पर्वा करत नाही. जर माझ्या जिल्ह्यातील तरुण पिढी बिघडत असेल आणि संसार उद्ध्वस्त होत असतील, तर मी गप्प बसणार नाही. पालकमंत्री असेपर्यंत हे धंदे मी मुळापासून उखडून टाकेन आणि यासाठी मला माध्यमांची साथ हवी आहे.“
2029 पर्यंत रोजगाराचे नवे पर्व
जिल्ह्यातील विकासाच्या भविष्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री कार्यालय जिल्ह्यातील प्रकल्पांसाठी जमिनीचा अभ्यास करत आहे. 2029 पर्यंत जिल्ह्यातील 50 टक्के तरुण, जे नोकरीसाठी बाहेर आहेत, ते पुन्हा जिल्ह्यात परततील इतक्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. चिपी विमानतळ 24 तास सुरू झाले असून, कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गासाठीही पुढाकार घेतला आहे. गोव्याच्या धर्तीवर जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न 5 लाखांपर्यंत नेण्याचा आमचा संकल्प आहे.
एकच कार्यक्रम व्हावा: बाळशास्त्री जांभेकर यांच्या जिल्ह्यात पत्रकारांचे दोन स्वतंत्र कार्यक्रम होणे अपेक्षित नाही. पत्रकार संघाने गटबाजी टाळून एकोप्याने काम करावे, यासाठी मी स्वतः प्रयत्न करीन. “मी चुकत असेन तर लेखणीच्या माध्यमातून ते जरूर दाखवून द्या, तुमच्या मार्गदर्शनाची मला नेहमी गरज आहे,“ असे सांगत त्यांनी लोकशाहीतील माध्यमांचे महत्त्व अधोरेखित केले.तालुका स्तरावर भवने : जिल्हा मुख्यालयाप्रमाणेच तालुका पातळीवरही पत्रकार भवने उभारण्यासाठी पत्रकारांनी प्रयत्न करावेत, त्याला सर्वतोपरी सहकार्य दिले जाईल.या कार्यक्रमाला जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते.