

सिंधुदुर्ग : कणकवली नगरपालिकेचा निकाल जो लागला त्यामागे मी मटका जुगार अड्ड्यावर टाकलेली धाड कारणीभूत आहे, असे मी मानत नाही. त्याची मला चिंता नाही. जिल्ह्यातील तरुण पिढी बरबाद होण्यापासून वाचविण्यासाठी यापुढेही अवैध दारूधंद्यांविरोधात आपण पालकमंत्री असेपर्यंत कठोर कारवाई करणार, त्यासाठी कोणतीही राजकीय किंमत मोजण्यास मी तयार आहे, असा इशारा देताना या लढाईत जिल्ह्यातील पत्रकारांनी मला साथ द्यावी असे आवाहन सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मंगळवारी सिंधुदुर्गनगरी येथे पत्रकार दिन कार्यक्रमात बोलताना केले.
सिंधुदुर्गनगरी येथे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर भवन येथे सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघांच्या वतीने पत्रकार दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याचे उद््घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे आणि प्रमुख वक्ते म्हणून पुढारी न्यूज चॅनेलचे संपादक प्रसन्न जोशी उपस्थित होते. या कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात आपली लढाई सुरूच राहील असा इशारा पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला.
पालकमंत्री नितेश राणे पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रोजगार निर्मितीसाठी अनेक प्रकल्प उभारण्याच्या कामास सुरूवात झाली आहे. यातुन निश्चितच लवकरच हे प्रकल्प पूर्ण होवून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरूण पिढी इथेच रोजगार मिळवेल. यापुढे त्यांना रोजगारासाठी पुणे, मुंबईकडे जावे लागणार नाही, इतका प्रामाणिक प्रयत्न आपण करत आहोत. परंतु त्याचवेळी आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या तरूण पिढीला चुकीच्या मार्गाने घेऊन जाणारे अवैध धंदे आम्हाला बंद करायचे आहेत. त्यासाठी काही कडू निर्णय घ्यायची आमची तयारी आहे. हे जे कडू निर्णय घेतले त्याचे फटके मला बसल्याचा काही लोकं सांगतात, परंतु ते मी मानत नाही आणि त्याची चिंताही करत नाही.
काही महिन्यांपूर्वी कणकवलीमध्ये मी मटका जुगारावर धाड टाकली, कणकवलीतील निकालानंतर मला सल्ले देणारे शंभर लोक तयार झाले आहेत. त्यांचे असे म्हणणे आहे की, मटका जुगारावर धाड टाकता कामा नये. सगळे मटकेवाले तुमच्याविरूध्द एकत्र झाले. तुमच्या विरोधात निवडणुकीमध्ये पैसे लावले गेले असे मला सांगण्यात आले. परंतु ते मी मानायला तयार नाही. असे कुणाला वाटत असेल की सर्व मिळून आपण नितेश राणे यांच्याविरूध्द उभे राहू तर मला यापुढे काही वेळ द्या, मी पालकमंत्री असेपर्यंत कुणालाही सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध धंदे करू देणार नाही. काय ताकद लावायची ती लावा, आम्ही इथे सगळे तयार आहोत असा इशाराही त्यांनी दिला.
जेव्हा मी पालकमंत्री झालो तेव्हा खा.नारायण राणे यांनी आपणास बोलावून घेतले आणि जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याच्या सूचना दिल्या. गोवा आपल्या बाजुला असल्यामुळे तेथुन ज्या काही चुकीच्या गोष्टी आपल्या जिल्ह्यात येतात त्या थांबायलाच हव्यात अशा त्यांच्या सूचना होत्या. खा.राणे यांनी सांगितल्यानंतर पोलिस खात्याच्या अधिकाऱ्यांबरोबर बसलो. काही अधिकारी म्हणाले, आपल्या इथे गोवा बनावटीची दारू येतच नाही. अवैध धंदे नसल्याचे काही अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु आम्हीही राजकारणी आहोत आमच्याकडेही गुप्त खाते आहे. ही सर्व यंत्रणा आम्ही कामाला लावली. काही चांगलेही अधिकारी आहेत. परंतु काही बांधलेले अधिकारी असतात त्यांनी अवैध धंद्यावाल्यांना संपर्क करण्यास सुरूवात केली. हप्त्याची रक्कम डबल करण्याची मागणी केली. म्हणून मग या धंद्यांमुळे जिल्ह्यातील तरूण पिढी बरबाद होत आहे. खिशातील पैसे मटका जुगारासाठी वापरले जात आहेत. तरूण पिढी खराब होत असेल आणि घरातील कर्ती पुरूष मंडळी व्यसनाधीन होत असेल, असे असताना अवैध धंद्याविरूध्द मी भुमिका घेतली नसती तर पालक या शब्दाला अर्थ काय उरला असता, असा माझा प्रश्न आहे असेही पालकमंत्री नितेश राणे म्हणाले.
म्हणून मी अवैध धंद्याविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतला. कणकवलीची नगरपालिकेची निवडणूक येते आहे हे माहित असुनही ही कारवाई मी केली. जेव्हा कारवाईची भूमिका घेतली तेव्हा मोठ्या आकड्याची ऑफर आली. परंतु जो ऑफर घेवून आला होता त्याला दोन पायाने परत जाणार नाही, असली ऑफर परत आणू नको असा इशारा दिला. माझे नाव नितेश नारायण राणे आहे, अशी ऑफर आम्हाला चालत नाही. त्या भुमिकेवर ठाम राहिलो तडजोड केली नाही. याही पुढे ती करणार नाही असेही पालकमंत्री नितेश राणे म्हणाले.