

देवगड : जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण कमी करून नागरीकांचे जीव सुरक्षित ठेवणे ही आपली सामूहीक जबाबदारी आहे. यासाठी प्रत्येकाने वाहतूक नियम काटेकोर पाळणे आवश्यक आहे. पर्यावरणपूरक धोरणाचा भाग म्हणून इलेक्ट्रीक वाहनांचा वापर वाढविण्यावर भर द्यावा यासाठी जिल्हा प्रशासनाने इलेक्ट्रीक वाहनांचा वापराला प्रोत्साहन देणारे उपक्रम राबवावेत. यासाठी पोलिस अधीक्षक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने असे उपक्रम राबविण्याचे नियोजन करावे, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
देवगड येथे सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस रेझींग डे अंतर्गत ‘रस्ता सुरक्षा अभियान’ जनजागृतीसाठी बाईक रॅलीचे उद्घाटन देवगड एस्टी स्थानक येथे सोमवारी सकाळी पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते झाले. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलिस अधीक्षक डॉ.मोहन दहिकर, कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे, कणकवलीचे डीवायएसपी घनश्याम आढाव, देवगड तहसीलदार रमेश पवार, सहा. गटविकास अधिकारी विनायक पाटील, माजी आ.ॲड.अजित गोगटे, उद्योगपती नंदकुमार घाटे, डॉक्टर फॅटर्निटी क्लबचे अध्यक्ष डॉ. सतीश लिंगायत, देवगड न्यायालयाचे एस. आर.जाधव, आगार व्यवस्थापक विजयकुमार घोलप, डॉ.सुनील आठवले, रोटरी क्लबचे अध्यक्ष गौरव पारकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात ना.राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.यानंतर ‘रस्ता सुरक्षा’ या विषयावर देवगड हायस्कूल व व्यसनमुक्तीबाबत गिर्ये हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे जनजागृती केली. ना. राणे म्हणाले, जीवन किती अमुल्य आहे याची जाणीव ठेवा. वाहन चालविताना नियमांचे पालन करा, .युवापिढी आयुष्याला हलक्यात घेत आहे. एका हातात मोबाईल व दुसऱ्या हातात बाईक अशी रील बनविण्याची फॅशन बनली आहे. मात्र हे प्रकार आपल्या आयुष्यासाठी धोकादायक आहेत याचा विचार युवावर्गाने व त्यांचा पालकांनीही करावा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी रस्ता सुरक्षेची सर्वांनीच काळजी घेवूया असे आवाहन केले.प्रास्ताविक मध्ये पोलिस अधीक्षक मोहन दहिकर यांनी रस्ता सुरक्षा हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे.जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी लोकसंख्येची घनता पाहता ते चिंताजनक असल्याचे सांगितले.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी रस्ता सुरक्षेची शपथ सर्वांना दिली. यावेळी देवगड ते सागरीमार्गे मालवण-वेंगुर्ला या बाईक रॅलीचा शुभारंभ मंत्री राणे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवुन करण्यात आला. या बाईक रॅलीत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलिस अधीक्षक डॉ.मोहन दहिकर सहभागी झाले. सूत्रसंचालन ऋत्विक धुरी आणि पोलिस हवालदार कोळसेकर यांनी केले. सहा.पोलिस निरिक्षक सुप्रिया बंगडे व पोलिस कर्मचारी, इतर शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी, देवगड आगाराचे अधिकारी व कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी, नागरीक उपस्थित होते.