

कुडाळ : शिक्षण हे माणसाला माणूस बनवण्याचे माध्यम आहे. या शिक्षणातून आपल्या मातीचे समाजाचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन आ. नीलेश राणे यांनी केले. कुडाळ महाविद्यालयाच्या प्राचार्या स्मिता सुरवसे यांनी मागणी केलेले रिसर्च सेंटर आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असेही त्यांनी सांगितले.
सावित्रीबाई फुले जयंती औचित्यावर संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ. डॉ. स्मिता सुरवसे लिखीत ‘ज्ञानज्योती बारा विज्ञान विरांगणा’ पुस्तकाचे प्रकाशन संत राऊळ महाराज महाविद्यालय कॉन्फरन्स हॉलमध्ये शनिवारी आ. राणे यांच्या हस्ते झाले. कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट, सहकार्यवाह आनंद वैद्य, महेंद्र गवस, ॲड. सुहास सावंत, लेखिका व प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे उपस्थित होत्या.
आ. नीलेश राणे म्हणाले, अशा प्रकारचे पुस्तक लिखाण करून समाजाला दिशा देण्याचे काम डॉ. स्मिता सुरवसे यांनी केले आहे. विज्ञान क्षेत्रामध्ये ज्यांनी कामगिरी करून सुद्धा त्या अजूनही समाजापुढे आल्या नाहीत. त्यांना समाजापुढे आणण्याचे काम या पुस्तकात करण्यात आले आहे. आपले शिक्षण आपला व्यवसाय हा समाजासाठी उपयोगी आला पाहिजे. आपल्या मातीसाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे. आम्ही सुद्धा परदेशात शिकलो पण या ठिकाणी मातीचे ऋण फेडण्यासाठी काम करत आहोत. विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण कितीही शिकलो तरी आपल्या माती बद्दल आपल्या गावाबद्दल प्रेम हे ठेवले पाहिजे. शहरी आणि ग्रामीण भागामध्ये नेहमीच शिक्षणाची दरी राहिली आहे. ही पुरी केली पाहिजे आणि आपले ध्येय हे भविष्याचे असले पाहिजे. सूत्रसंचालन प्रा. संतोष वालावलकर यांनी केले. आभार डॉ. कमलाकर चव्हाण यांनी मानले.