

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील डिगस-सुर्वेवाडी परिसरात लोकवस्तीलगत गवा रेड्यांचा धमाकुळ सुरू आहे. शुक्रवारी सायंकाळी उशिरा पणदूर-घोडगे रस्त्यावर तसेच चोरगेवाडी फाटा नजिक रस्त्यावर वाहनचालकांना गवा रेड्यांचे दर्शन झाले. वाहनांच्या समोरून गवा वेगात धावत गेला, मात्र वाहनचालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला. गवा रेड्यांचा वावर वाढल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने ॲक्शन मोडवर येत गस्त वाढवली होती.
पणदूर - घोडगे रस्त्यावरील डिगस- चोरगेवाडी फाटा नजिक परिसरात गेल्या काही दिवसांपासून गवा रेड्यांचा वावर आहे. भरदिवसा हे गवे हिंदेवाडी रस्त्यावर दृष्टीस पडतात. यातील एक गवा रेडा वारंवार रस्त्यांवर वावरत असल्याने या रस्त्यावरून रात्रीची वाहने चालवीने कसरतीचे ठरत आहे. शुक्रवारी सायंकाळी उशिरा सुर्वेवाडी नजिक रस्त्यावर गवा रेडा वाहनचालकांच्या नजरेत पडला. त्यानंतर पणदूर-घोडगे रस्त्यावर चोरगेवाडी तलावाजवळ या गवारेड्याचे पुन्हा दर्शन झाले. दरम्यान काही वेळात खांदीचेगाळू -हुमरमळा या परिसरातही गवा रेडा आढळून आला. तेथील रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांना हा गवारेडा दिसून आला. या भागात गेल्या काही दिवसांपासून गवा रेड्यांचा वावर वाढला असून, रात्रीच्या वेळी हे गवे रस्त्यांवर दाखल होत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे शेतकरी व स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. लोकवस्ती व वाहतूक असलेल्या रस्त्यांवर गवा रेड्यांचा मुक्त संचार सुरू असल्याने वनविभागाने तातडीने दखल घेऊन या गवा रेड्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. गवा रेडा रस्त्यांवर दाखल झाल्याची माहिती मिळताच वनविभाग सतर्क झाला. काही वेळातच वनविभागाची टीम या परिसरात दाखल झाली. रात्री उशिरापर्यंत वन कर्मचाऱ्यांनी या परिसरात जागता पहारा ठेवला होता.