

दोडामार्ग : मांगेलीचा धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला असून हजारो पर्यटकांनी वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी रविवारी हजेरी लावली. त्यामुळे मांगेलीचे वर्षा पर्यटन चांगलेच फुलले होते.
कर्नाटक-महाराष्ट्र आणि गोवा या तीन राज्यांच्या सीमेवरील मांगेली धबधबा वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. समुद्रसपाटीपासून उंचावर असलेल्या या गावात हिरवाईने नटलेल्या डोंगर रांगांमधून पडणारे दुधेरी धबधबे, क्षणात हवेत निर्माण होणारे दाट धुके आणि गालाला हळूच स्पर्श करून जाणारी गारेगार हवा येथे येणार्या पर्यटकांचे मन प्रसन्न करून सोडते.
मांगेली-फणसवाडी येथील धबधबा सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आला आहे. त्यामुळे दरवर्षी गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या तिन्ही राज्यातील पर्यटक मोठ्या संख्येने मांगेलीत येऊन वर्षा पर्यटनाचा आनंद लुटतात.
शनिवार व रविवारी तर मोठी गर्दी पहायला मिळते. रविवारी मांगेलीत वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येण्याचा मोह पर्यटकांना आवरता आला नाही. त्यामुळे हजारोंच्या संख्येने दाखल झालेल्या पर्यटकांमुळे मांगेली हाऊसफुल्ल झाली होती. गोव्यातील पर्यटक मोठ्या संख्येने आले होते. पर्यटकांनी खबरदारी घेत पर्यटनाचा आनंद लुटला. यावेळी स्थानिकांनी लहान-मोठे हॉटेल्स, स्टॉल्स उभारले होते. पोलिस प्रशासनाने येथे बंदोबस्त ठेवला होता.