

मालवण : मालवण नगरपालिकेत कंत्राटी पद्धतीवर काम करणार्या स्वच्छता कामगारांचे गेल्या दोन महिन्यांचे वेतन संबंधित ठेकेदारांनी न दिल्याने आक्रमक कंत्राटी स्वच्छता कामगारांनी शनिवार पासून बेमुदत काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
जीवाची पर्वा न करता शहरात कचरा उचल करण्याचे काम करूनही वेळेवर वेतन न मिळाल्याने आमच्या कुटुंबाची उपासमार होत आहे. त्यामुळे थकीत वेतन मिळवून देऊन आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी कामगारांनी नगरपालिका प्रशासनाकडे केली आहे.
मालवण शहरातील कचरा उचल व व्यवस्थापन करण्यासाठी मालवण नगरपालिकेकडून डिसेंबर 2019 मध्ये स्वच्छता विभागासाठी दोन ठेके प्रसिद्ध केले होते. त्यानुसार निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन ठेकेदारांनी मालवण नगरपालिकेला कचर्याचा उठाव करण्यासाठी कामगार पुरवणे तसेच चालक पुरविणे असे ठेके घेतले. एकूण 17 स्वच्छता कंत्राटी कामगारांचा दोन महिन्यांचा पगार दिलेला नाही. तर यातील एकाचा फेब्रुवारी महिन्याचा व एकाचा मार्च महिन्याचा देखील पगार काही कारणास्तव ठेकेदाराने दिलेला नाही.
जीवाची पर्वा न करता प्रामाणिक सेवा देऊनही वारंवार पगार थकीत ठेवला जात असल्याने आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे असे सांगत कंत्राटी कामगार व चालकांनी व्यथा मांडली.