

मालवण : प्रत्येकाला घर मिळावे आणि सर्वांमध्ये स्थैर्य निर्माण होऊन राहणीमान सुधारणे हे उद्दिष्ट समोर ठेऊन दरवर्षी महाराष्ट्र शासनामार्फत महा आवास अभियान-ग्रामीण हा उपक्रम राबविण्यात येतो. सदर उपक्रमातील उत्कृष्ट काम करणार्या संस्था, व्यक्तींना पुरस्कार दिले जातात. या अभियानामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मध्ये मालवण तालुक्यात खरारे-पेंडूर या ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
या पुरस्काराचा वितरण समारंभ कुडाळ मालवण आमदार नीलेश राणे यांच्या हस्ते सौ. इंदिराबाई दत्तात्रय वर्दम हायस्कूल सभागृह, पोईप येथे पार पडला. यावेळी गटविकास अधिकारी शाम चव्हाण, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, तालुकाप्रमुख राजा गावडे, जि.प. माजी वित्त व बांधकाम सभापती अनिल कांदळकर, जि.प. माजी वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर, माजी सभापती राजू प्रभुदेसाई, शहर प्रमुख दीपक पाटकर यांसह अन्य पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते.
आ. नीलेश राणे यांनी पुरस्कार देत सर्वांचे अभिनंदन केले. सरपंच नेहा परब, उपसरपंच सुमित सावंत, ग्रामपंचायत अधिकारी कोठावळे, ग्रा.पं. सदस्य अश्विनी पेडणेकर, अंकिता सावंत, वैष्णवी लाड, कर्मचारी अनिल पाटील, हृषीकेश लाड आदी उपस्थित होते.