पुणे: प्रधानमंत्री आवास योजनेतून ग्रामविकास विभागाने उत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळे आता केंद्राकडून आणखी 10 लाख घरांना मान्यता मिळणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र हे देशातील पहिले बेघरमुक्त राष्ट्र होईल असा प्रयत्न करा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामविकास विभागाला दिल्या.
पुण्यातील यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी (यशदा) येथे मुख्यमंत्री बोलत होते. कार्यक्रमाला ग्रामविकास पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, प्रधान सचिव एकनाथ डवले, यशदाचे महासंचालक निरंजन सुधांशू, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, उत्तम प्रशासनासाठी मनुष्यबळाचा विकास महत्त्वाचा आहे. त्यासाठी उपलब्ध मनुष्यबळाचा कार्यक्षम उपयोग कसा करता येईल, याचा विचार करावा. इतर ठिकाणच्या चांगल्या कल्पनांचे अनुसरण करावे.
कार्यशाळेत शिकायला मिळणार्या बाबी राज्याच्या प्रशासकीय व्यवस्थेसाठी महत्त्वाच्या ठरतील. अनुभवी अधिकार्यांचे विविध प्रयोग इतरांना मार्गदर्शक आहेत, ते संकलित झाले आणि समजून घेतले तर प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यास मदत होते
30 लाख घरांचे उद्दिष्ट : जयकुमार गोरे
ग्रामविकास मंत्री गोरे म्हणाले, पहिल्या बैठकीत साडेतेरा लाख घरांना मान्यता देण्यात आली आणि 10 लाख घरांना पहिला हप्ता देण्यात आला. त्यातील 46 हजार घरे पूर्ण झाली आहेत. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून 30 लाख घरे उभारण्याचे उद्दिष्ट आहे, त्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
नरेगा डॅशबोर्डचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
ग्रामविकास विभागाच्या 100 दिवस कार्यक्रमांतर्गत तयार करण्यात आलेले सिंगल युनिफाइड पोर्टल, संचालक ग्रामीण गृहनिर्माण कार्यालय यांनी तयार केलेल्या आवास वितरण, भूमिलाभ पोर्टल, महाआवास अभियान डॅशबोर्ड, आयुक्त मनरेगा नागपूर यांनी तयार केलेल्या पीएमएवाय आणि नरेगा डॅशबोर्डचे उद्घाटन आणि राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानांतर्गत बनविलेल्या चित्रफितीचे अनावरण फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.