

Malvan Mock Drill
मालवण : काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून खबरदारीचा उपाय म्हणून युद्धजन्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी आयोजित केलेले मॉकड्रिल आज मालवणात संपन्न झाले. यामध्ये सर्व प्रशासकीय विभाग एकत्रितपणे सहभागी झाले होते.
किनारी भागात सुरक्षा विषयक काळजी घेण्याच्या दृष्टीने दांडी किनारा, बंदर जेटी आणि राजकोट किल्ला परिसरात मॉकड्रिल घेण्यात आले. शत्रूचा हल्ला अथवा आपत्ती झाल्याचा संदेश नगरपालिकेचा सायरन वाजवून दिल्यानंतर राजकोट या निश्चित केलेल्या घटनास्थळी पोलीस यंत्रणा त्वरित पोहचणे, आपत्तीमुळे लागलेली आग विझविणे, जखमींवर तात्काळ उपचार करून त्वरित आरोग्य सेवा उपलब्ध करणे आदी प्रात्यक्षिके यावेळी यशस्वीरित्या करण्यात आली.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून काश्मीर सीमेवर सुरु असलेल्या सैन्य कारवाईच्या पार्श्वभूमीवर युद्धाची परिस्थिती उद्भवल्यास प्रशासन व नागरिकांनी त्याचा सामना कसा करावा यासाठी देशभर मॉकड्रिल करण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या होत्या. मॉकड्रिल मध्ये किनारपट्टीवरील संवेदनशील असलेल्या मालवण शहराचाही समावेश होता. या पार्श्वभूमीवर मॉक ड्रिल संदर्भातील शासनाकडून दिल्या गेलेल्या सूचनांप्रमाणे सायंकाळी ४ वाजता शत्रूचा हल्ला अथवा आपत्कालीन स्थिती उद्भविल्याचा संदेश देणारा सायरन मालवण नगरपालिकेकडून वाजविण्यात आला.
याद्वारे नागरिकांना सुरक्षित स्थळी लपण्याचा संदेश देण्यात आला. यावेळी पोलीस यंत्रणा नगरपालिका क्षेत्रात बंदोबस्तासाठी दाखल झाली. याचवेळी मालवण बंदर विभागाकडून सायरन वाजवून इशारा दिल्यावर बंदर जेटी निर्मनुष्य झाली. या दरम्यान मॉकड्रिल साठी निश्चित केलेल्या राजकोट किल्ला परिसरात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्याची माहिती सर्व प्रशासकीय यंत्रणाना दिली गेल्यावर सर्वप्रथम पोलिसांनी राजकोट कडे धाव घेत बंदोबस्त निर्माण केला. तसेच पाठोपाठ नगरपालिकेचा अग्निशमन बंब व रुग्णवाहिका याठिकाणी दाखल झाली.
तसेच महसूल, नगरपालिका, आरोग्य, पंचायत समिती आदी व इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. शत्रूच्या हल्ल्याने लागलेली प्रतिकात्मक आग यावेळी स्प्रे तसेच अग्निशमन बंबाच्या साहाय्याने तात्काळ विझविण्यात आली. तर आरोग्य कर्मचाऱ्यांनी प्रतिकात्मक जखमी व्यक्तीला बाजूला घेऊन प्राथमिक उपचार करत तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले. यानंतर पुन्हा सायरन वाजवून आपत्कालीन स्थिती नियंत्रणात आल्याचा व नागरिकांनी घराबाहेर पडण्यास हरकत नसल्याचा संदेश देण्यात आला.
यावेळी तहसीलदार वर्षा झाल्टे यांनी राजकोट येथे ११ मे रोजी मुख्यमंत्र्यांचा दौरा असल्याने मॉकड्रिल साठी हे स्थळ निवडण्यात आल्याचे सांगितले. शासनाच्या सूचनांप्रमाणे कार्यवाही करत हे मॉकड्रिल यशस्वीरित्या पार पडले असेही त्यांनी सांगितले.