

ठाणे: पुढारी ऑनलाइन डेस्क | केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार राज्यभरात मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील कर्णिक मार्गावरील रामबाग लेन येथील मॅक्सी मैदान परिसरात दुपारी ४ वाजता मॉक ड्रिलचे प्रात्यक्षिके दाखवण्यात आले. याबाबत जिल्हा प्रशासनाकडून माहिती देण्यात आली होती. या मॉकड्रीलमध्ये कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले.
जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून देशभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये आज ७ मे रोजी युद्धजन्य परिस्थितीची मॉक ड्रिल घेण्याचा निर्णय घेतला.
युद्धजन्य किंवा आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास नागरिकांनी कोणती सतर्कता बाळगावी, तसेच प्रशासनाने कोणती पावले उचलावी, यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या. यामध्ये महाराष्ट्रातील 16 ठिकाणांचा यात समावेश असून, बुधवार (दि.7) रोजी मॉक ड्रिल्स घेण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरात हे मॉक ड्रिल घेण्यात आले. या मोहिमेला केंद्र सरकारकडून "ऑपरेशन अभ्यास" असे नाव देण्यात आले आहे.
मॉक ड्रिलच्या वेळेत शासनाकडून सूचना मिळाल्यानंतर कल्याण येथील कर्णिक मार्गावरील रामबाग लेन येथे बुधवार (दि.7) रोजी दुपारी 4 वाजता नागरी संरक्षण दलाचे सायरन वाजवून नागरिकांना धोक्याचा इशारा देण्यात आला. नागरिकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे सांगण्यात आले. मॉक ड्रिल ही केवळ पूर्वतयारीचा भाग असून कोणतीही खरी आपत्ती उद्भवलेली नाही असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले.
कल्याण आणि आजूबाजूच्या परिसरातील एकूण चार सायरन एकाच वेळी वाजवण्यात आला.
एयर स्ट्राईक, बॉम्ब हल्ल्याची सूचना
सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठीच्या सूचना
धावाधाव, गडबड गोंधळ न करता नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचविण्यात बाबत सुचना
संबंधित परिसरात शोध मोहीम घेवून जखमी, अडकलेल्या नागरिकांची तात्काळ सुटका करणे, त्यांना प्रथमोपचार करणे, अशी कार्यवाही करण्यात आली