

Ratnagiri emergency drill
रत्नागिरी : जिल्ह्यात पाच ठिकाणी प्रशासनाच्या वतीने आज (दि.७) मॉकड्रिल करण्यात आले. यावेळी सायरन वाजवून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास प्रशासन सज्ज असल्याची रंगीत तालीम घेण्यात आली. नागरी संरक्षण दलाचे जिल्हा उपनियंत्रक लेफ्टनंट कर्नल प्रशांत चतुर यांच्या मार्गदर्शनाखाली मॉक ड्रिल घेण्यात आले.
केंद्रीय गृह मंत्रालयाने नागरी संरक्षण सज्जता मजबूत करण्यासाठी ऑपरेशन अभ्यास रंगीत तालीम (मॉक ड्रिल) करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील रत्नागिरी तहसिलदार कार्यालय, रत्नागिरी रेल्वेस्थानक, राजापूर नगरपालिका, दापोली आणि संगमेश्वर तालुक्यातील एका ग्रामपंचायतीच्या हद्दीत मॉक ड्रिल झाले.
आरोग्य यंत्रणा, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, प्रथोमोपचार या अत्यावश्यक गोष्टींबाबत चाचणी घेण्यात आली. मत्स्यविभाग, बंदरे, मेरीटाईम बोर्ड, फिनोलेक्स, जेएसडब्ल्यू, अल्ट्राटेक आदी कंपन्या, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत औद्योगिक वसाहतीमधील महाविद्यालयांनी मॉक ड्रिल करुन त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर केला जाणार आहे.