

ओरोस : ‘लाडकी बहीण’ योजनेच्या जीवावर निवडून आलेल्या महायुती सरकारमधील काही मंत्री आईच्या नावावर डान्स बार चालवत आहेत, काही मंत्री बेलगाम विधाने करून जनता, शेतकरी व शासनाचा अपमान करत आहेत. मात्र, या मंत्र्यांवर कारवाई करण्याऐवजी मुख्यमंत्री त्यांना अभय देत आहेत, ही बाब संतापजनक आहे. तरी राज्याच्या पुरोगामी प्रतिमेला धक्का लावणार्या या भ्रष्टाचारी मंत्र्यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणी करत सोमवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जन आक्रोश आंदोलन छेडले. तसेच, याबाबत मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी जिल्हाधिकार्यांकडे निवेदन सादर केले.
सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या जनआक्रोश आंदोलनात ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर व बाबुराव धुरी, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, माजी आ. राजन तेली, महिला आघाडी जिल्हाप्रमुख नीलम पालव- सावंत, कन्हैया पारकर आदींसह पदाधिकारी व शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते ‘कलंकित मंत्र्यांचा राजीनामा घ्या’, ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा विजय असो’ अशा विविध घोषणा या शिवसैनिकांनी दिल्या. त्यानंतर अति. जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्याकडे मुख्यमंत्र्यासाठी निवेदन सादर केले.
जिल्हाप्रमुख संदेश पारकर, बाबुराव धुरी, कणकवली विधानसभा अध्यक्ष सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमूख सुशांत नाईक यांनी विचार व्यक्त केले. राज्य सरकारमधील गृहराज्यमंत्री योगेश कदम, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, विद्यमान क्रीडामंत्री माणिक कोकाटे व अन्य वादग्रस्त मंत्र्यांचे राजीनामे प्राधान्याने घ्यावेत, या मागणीसाठी आम्ही हा ‘जनआक्रोश’ मुख्यमंत्र्यांच्या निर्दशनास आणत आहोत. राज्य सरकारचे लक्ष वेधत आहोत, असे ठाकरे शिवसेनेच्या आंदोलक पदाधिकार्यांनी सांगितले.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सरकारमधील काही मंत्री अकार्यक्षम व वादग्रस्त आहेत. दुसरीकडे शेतकर्यांना कर्जमाफी देण्यास टाळाटाळ केली जात आहे. पिक विमा योजनेत अवाजवी निकष लावून शेतकर्यांची पिळवणूक सुरू आहे. शेतकरी, जनतेचे प्रश्न सोडवण्या ऐवजी सरकार व मुख्यमंत्री भ्रष्ट, कलंकी मंत्र्यांची पाठराखण करत आहेत. विधानसभेत ऑनलाईन रमी खेळणारे मंत्री कोकाटे यांची कृषी खात्यावरून उचल बांगडी करून त्यांना क्रीडा खाते दिले आहे. ही जनता व शेतकर्यांची कू्रर चेेष्टा आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी नैतिकता म्हणून या मंत्र्यांची हकालपट्टी करावी, अशी आमची मागणी आहे. राज्यभरात सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अशी आंदोलने छेडण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हाप्रमूख संदेश पारकर व बाबुराव धुरी यांनी दिली.