

दोडामार्ग : कुडासे- धनगरवाडी येथे पुन्हा दिवसाढवळ्या घरफोडी झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे आठ दिवसांपूर्वी शनिवारी सकाळी माटणे येथे घरफोडी झाली होती. ही घटना ताजी असतानाच दुसरी घरफोडी झाली आहे. घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेत मनोहर बाबली कुडासकर यांचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून साडेतीन लाखांच्या दागिन्यांसह आठ हजार रुपये रोख रक्कम लंपास केली.
कुडासे- धनगरवाडी येथील मनोहर कुडासकर हे शनिवारी सकाळी पत्नीसह शेतात गेले होते. त्यांचा मुलगा खत आणण्यासाठी बाजारपेठेत गेला होता. शेतात जाताना कुडासकर यांनी दरवाजाला कुलूप करून चावी बाहेरील व्हरांड्यात ठेवली होती. दरम्यान त्यांचा मुलगा बाजारपेठेतून घरी आला असता दरवाजाला कुलूप नव्हते. त्याने दरवाजा ढकलला. पण तो उघडला नाही. दरवाजा आतून बंद असल्याचे समजताच तो मागील दरवाजाने आत गेला असता, त्याला घरातील सामान अस्ताव्यस्त पडल्याचे दिसले. त्यामुळे घरात चोरी झाल्याचा संशय त्याला आला.
कपाटात ठेवलेले दागिने पाहण्यासाठी तो गेले असता तेथे दागिने नसल्याचे निदर्शनास आले. त्याने या घटनेची माहिती दोडामार्ग पोलिस ठाण्यात दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पंचनामा केला. यावेळी अज्ञात चोरट्यांनी बाहेर ठेवलेली चावी घेऊन कुलूप काढले व घरातील कपाट उघडून अडीच तोळ्याचे मंगळसूत्र, एक तोळ्याची चैन व रोख रक्कम 8 हजार रुपये घेऊन घराच्या मागच्या दरवाजाने पळ काढल्याचे निदर्शनास आले. अधिक तपास पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे करीत आहेत.
कुडासे येथे घरफोडी करताना चोरट्यांनी माटणे येथे केलेल्या घरफोडीचे तंत्र वापरले. घराचे कुलूप काढून तो आतून बंद केला. त्यानंतर चोरी करून पाठीमागच्या दरवाजाने चोरट्यांनी पोबारा केला. त्यामुळे हे चोर जेथे चोरी करायची आहे बहुदा तेथील हेकी करून घरफोडी करत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय दिवसाढवळ्या आणि शनिवारीच घरफोडी होत असल्यामुळे हे चोर पोलिस यंत्रणेला एक प्रकारे आव्हानच देत आहेत. त्यामुळे या चोरट्यांना गजाआड करण्याचे आव्हान पोलिस कितपत पेलतील? हे मात्र येणारा काळच सांगेल.