

कुडाळ : पहिल्याच पावसात काँक्रिटीकरण रस्त्याचा अशा प्रकारे मुलामा वाहून गेला. दुसर्या छायाचित्रात बंदिस्त गटारावरील सिमेंटचा थर सुद्धा वाहून गेला.
कुडाळ : कुडाळ येथील हॉटेल गुलमोहर जवळील कर्ली नदी किनारी गणेश घाटाकडे जाणार्या सहाशे मीटर रस्त्यावर काँक्रिटीकरणासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून एक कोटींची धूळफेक करण्यात आली.
मात्र पहिल्या पावसाच्या सरीत या कॉँक्रीट रस्त्याचा मुलामा वाहून गेल्याने रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याचे सिद्ध झाले. याबाबत मनसेने सुध्दा थेट आरोप करत रस्त्याच्या कामाची पोलखोल केली आहे.लोकप्रतिनिधींनी याकडे वेळीच लक्ष देण्याची विनंती केली आहे.
कुडाळ पंचायत समिती नजीक हॉटेल गुलमोहर जवळून कर्ली नदीवरील बंधार्याकडे व गणेश घाटाकडे जाणारा हा रस्ता आहे. या रस्त्यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून एक कोटी रुपयेचा निधी मंजूर करण्यात आला. घाईगडबडीत विकासकाने सदर काम पूर्ण केले, मात्र कामाच्या टिकाऊपणाबाबत आधीच साशंकता होती. ही साशंकता पहिल्या पावसात खरी ठरली. कारण पहिल्या पावसातच या काँक्रिटीकरण रस्त्याचा मुलामा वाहून गेला आहे.त्यामुळे 1 कोटी रुपयांचे हे काम नेमके कुणासाठी? विकासक की अधिकारी? याबाबत कुडाळ शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.
खरं तर शासन धोरणानुसार प्रत्येक कामाचा बोर्ड त्या-त्या ठिकाणच्या कामांवर लावणे बंधनकारक आहे. मात्र अधिकारी आणि ठेकेदार यांच्यातील अंतर्गत हितसंबंंधामुळे कुडाळमधील त्या कोटीच्या काँक्रीट रस्त्यावर अंदाजपत्रक रक्कम, ठेकेदाराचे नाव,काम पूर्ण होण्याची दिनांक आदी महत्वाच्या माहितीचा बोर्ड अद्यापपर्यंत लावलेला नाही.
1 कोटी रुपये काँक्रीट रस्त्याच्या निकृष्ट कामासंदर्भात महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी श्री.पटेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळू शकला नाही.
शहरातील गणेश घाटकडे जाणारा हा रस्ता होऊन जेमतेम दीड दोन महिने झालेत. सदर रस्ता महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डमार्फत तब्बल 80 ते 90 लाख रूपये खर्चून बांधण्यात आला आहे. रस्त्याच्या दुतर्फा बंदिस्त गटाराचे बांधकाम रस्त्यासोबतच करण्यात आले. मात्र सदर काम पहिल्याच पावसात वाहून गेले आहे. या निकृष्ट कामासंदर्भात संबंधित विभागास विचारले असता वापरलेले सिमेंट खराब दर्जाचे असल्याचे अजब उत्तर अधिकारी देत आहेत. काम करणारा पोट ठेकेदार हा सत्ताधारी आमदारांच्या जवळचा कार्यकर्ता असल्यामुळे अधिकारीही कारवाई करण्यास चालढकल करत आहेत. निकृष्ट विकासकामांबाबत आ.नीलेश राणे यांनी प्रसंगी आपले कार्यकर्ते पदाधिकारी असले तरी कठोर भूमिका घेऊन जनतेला होणारा त्रास दूर करण्यासाठी हा रस्ता पूर्ववत करून घ्यावा.
कुणाल किनळेकर,मनसे कार्यकता