

कुडाळ : जिल्ह्यात बुधवारपासून मुसळधार पाऊस कोसळत असून, कुडाळ तालुक्यालाही मुसळधार पावसाने झोडपून काढले. सह्याद्री पट्ट्यातही धुवाधार पाऊस कोसळत असून, सर्वच नदी, नाल्यांना पूर आला आहे. तालुक्यातील भंगसाळ (कर्ली) नदीने रौद्ररुप धारण केल्याने गुरूवारी पहाटेपासून पुराच्या पाण्याने नदीचे पात्र सोडले. या पुराचे पाणी कुडाळ शहरात नदीकिनारी भागात शिरून पूरस्थिती निर्माण झाली. शहरातील आंबेडकर नगरातील 10, वेताळबांबर्डेत 4 यासह अन्य ठिकाणी मिळून 20 हून अधिक घरांना पुराच्या पाण्याने वेढा दिला तर काही घरांमध्येही पुराचे पाणी घुसले. सखल भागात रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली. मुसळधार पावसाची बॅटिंग सुरुच असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
कुडाळ शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर, भैरववाडी, काळपनाका-लक्ष्मीवाडी, कविलकाटे तसेच पावशी भागात घरांना पुराच्या पाण्याने वेढा घातला. शहरातील हॉटेल गुलमोहर नजीक तसेच सिद्धिविनायक हॉल नजीक रेल्वे स्टेशन रोड-बांव रस्त्यावर पाणी आल्याने शहरात येणारे दोन्ही मार्ग ठप्प झाले. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. वेताळबांबर्डेमधील हातेरी नदीला पूर आल्याने वेताळबांबर्डे आणि पणदूर गावात नदीकिनारी भागात पुराचे पाणी घरापर्यंत दाखल झाले होते.
किनारी भागातील भातशेतीही पुराच्या पाण्याखाली गेली. पुराचा धोका लक्षात घेऊन अनेक नागरिक साहित्यासह सुरक्षितस्थळी दाखल झाले. तालुक्यात गेल्या चोवीस तासांत 175 मिमी. पावसाची नोंद झाली आहे. तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी पूरग्रस्त भागात भेट देऊन, आढावा घेतला. तसेच नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले.
गुरूवारी माणगाव निर्मला नदी, कुडाळ भंगसाळ (कर्ली), पावशी बेलनदी, वेताळबांबर्डे हातेरी नदी, हुमरमळा पीठढवळ नदी तसेच आंदुर्ले येथील नदी या सर्वच नद्यांना पूर आला. नालेही ओसंडून वाहत आहेत. नद्यांच्या पुराचे पाणी पहाटेपासून किनारी भागात शिरण्यास सुरुवात झाली. माणगांव खोर्यातील दुकानवाड पुलावर पाणी आल्याने शिवापूर व परिसरातील गावांमधील वाहतूक विस्कळीत झाली. वेताळबांबर्डे नदीच्या पुराचे पाणी तेलीवाडी तसेच पावशी व पणदूर भागात वस्तीपर्यंत शिरले होते. पूरग्रस्त भागात भातशेती पाण्याखाली गेली असून ती कुजून नुकसान होण्याची भीती आहे.
कुडाळ- काळपनाका जवळ निवासी संकुलांपर्यंत पुराचे पाणी दाखल झाले होते. क्षितिज अपार्टमेंट ते गुलमोहर हॉटेल दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद झाला. या रस्त्यावरील वाहतूक लक्ष्मीवाडी व उद्यमनगरमार्गे वळविण्यात आली. रेल्वेस्टेशन व बांव रस्त्यावर सिद्धिविनायक हॉल नजीक पाणी आल्याने हा मार्गही बंद झाला. त्यामुळे बाव मार्गावरील एसटी वाहतूक बंद झाली. गुलमोहरकडून होणारी वाहतूक राज हॉटेलमार्गे हायवेने वळविण्यात आली. पोलिस प्रशासनामार्फत दोन्ही रस्त्यांवर बॅरिगेटस लावत खबरदारी घेण्यात आली. भंगसाळ नदीकडे जाणारा रस्ताही पुराच्या पाण्याखाली गेला होता.
घरांना पुराच्या पाण्याने वेढा दिल्यानंतर नागरिकांनी घरातील साहित्यासह सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले. पंचायत समिती कार्यालयामागे परप्रांतीयांच्या झोपड्यांमध्ये पुराचे पाणी घुसले. त्यामुळे साहित्य भिजून नुकसान झाले. नागरिकांनी पाण्यातून साहित्य सुरक्षितस्थळी हलविले. आवळेगाव-कुसगाव रस्त्यावरील पुलावर मोठा खड्डा पडल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. या मार्गावरील एसटी वाहतूक हिंदेवाडी मार्गे पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. अनेक ठिकाणी घरांवर झाडे पडून घरांचे नुकसान झाले. वाहतूक, वीज, दूरध्वनी, इंटरनेट सेवा विस्कळीत झाली.
माणगाव खोर्यात बुधवार पासून धुवाधार पाऊस कोसळत आहे. यामुळेे कर्ली नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे,त्यामुळे माणगाव, शिवापूर या मुख्य मार्गावरील दुकानवाड कॉजवे पाण्याखाली गेला तर त्या लगत असलेल्या जुन्या धोकादायक लोखंडी साकवाला पाणी धडकत आहे. त्याच साकवारून येता- जाताना नागरिकांची जीवघेणी कसरत सुरू आहे.
कुडाळचे तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी ऑन फिल्ड येत गुरूवारी सकाळी कुडाळ, पावशी व तालुक्यातील अन्य पूरग्रस्त भागात प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेतला. पूरपरिस्थितीत नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन त्यांनी केले. कर्ली नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. या नदीच्या पूरप्रवण क्षेत्रात येणार्या कुडाळ, पावशी, बांव, सरंबळ, चेंदवण या भागातील नागरिकांनी प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.