

कुडाळ : कुडाळ बाजारपेठ मधील श्री देव नगर ब्राह्मण मारूती देवस्थान येथे रविवारी आषाढी एकादशीनिमित्त प्रतिपंढरपूरचा देखावा साकारण्यात आला. यावेळी श्री विठ्ठल - रखुमाईच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त मागील सात दिवस येथे दररोज धार्मिक कार्यक्रम, भजने यासह विविध कार्यक्रम मंदिरात सुरू आहेत. दिवसभर श्री मारूतीरायासह श्री विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. श्री विठूमाऊलीच्या नामाचा जयघोषाने अवघी कुडाळनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली.
आषाढी एकादशीला असंख्य वारकरी श्री विठ्ठल-रखुमाईचा नामघोष करीत पंढरपूर येथे श्री विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाला पायी चालत जातात. याच आषाढी एकादशीनिमित्त रविवारी या श्री मारूती मंदिरात साक्षातप्रति पंढरपूरदेखावा साकारण्यात आला. श्री मारूतीरायासह पंढरपूरच्या श्री विठ्ठल - रखुमाईचे पूजन करण्यात आले.
सकाळी सिंधुदुर्ग वारकरी समाज मंडळ आणि सिद्धिविनायक मंडळ यांनी वारकरी भजन सादर करून विठू नामाचा जयघोष केला. दुपारनंतर माऊली वारकरी मंडळ (वारगांव)चे भजन, महादेश्वर ढोलपथक (नाडण) यांचे ढोलवादन, आई महालक्ष्मी दिंडी वारकरी भजन (इळये-कुणकेश्वर) यांचे संगीत भजन स्पर्धेतील भजन झाले.
चित्ररथ दिंडी सोहळा पार पडला. मंदिरात दिवसभर टाळ मृदूंगाच्या तालावर अभंग आणि विठूमाऊलीचा गजर सुरू होता. सोमवार 7 जुलै रोजी पहाटे 4 वा. काकड आरती भजन, सकाळी 9 वा. गोपाळ काल्याने या हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे.