Pandharpur Wari : देखाेनिया पंढरपूर जीवा आनंद अपार |

Pandharpur Wari 2025
Pandharpur Wari : देखाेनिया पंढरपूर जीवा आनंद अपार |Pudhari File Photo
Published on
Updated on

डॉ. प्रकाश खांडगे, संत साहित्याचे अभ्यासक

आषाढी एकादशी म्हणजे भक्तीचा महापूर. वैष्णवजनांचा कुंभमेळा. तन असो वा मन, इतकंच काय संपूर्ण विश्व... सर्वच कसं विठ्ठलमय! त्यातूनच पुढे येतो तो, ‘वैष्णवांचा मेळा, विष्णुमय जग। वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ॥’ हा विचार. चराचरात भरलेल्या त्या विठूच्या ओढीने पंढरपुराकडे चालणारी पावलं सुख-दुःखाच्या पलीकडची. संत जनाबाई, मुक्ताबाई, सोयराबाईचा धावा करीत ‘ग्यानबा तुकारामा’चा गजर आसमंतात भरून वाहतो...

पंढरीचा पांडुरंग म्हणजे तमाम भागवत भक्तांचे सुखनिधान. पंढरीची वारी अध्यात्मबोधासोबतच लोकप्रबोधनाची परंपरा वर्षानुवर्षे ‘केला नेम चालवी माझा’ या निष्ठेने पुढे नेत आहे. अलीकडच्या काळात एकीकडे डिजिटल माध्यमांच्या साथीमुळे ही वारी हायटेक होत आहे, तर दुसरीकडे शिक्षण, आरोग्य, पर्यावरण रक्षण आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सक्रिय असलेल्या सेवाभावी कार्यकर्ते, लोककलावंतांच्या कृतिशील सहभागाने ती अधिकाधिक सामाजिकही होत आहे. त्यामुळे ती परंपरा आणि नवता या दोघांचा सुरेख संगम ठरली आहे. वारी हे केवळ आता धर्मकारण राहिले नाही, तर ते समाजकारणही झाले आहे. वारीचे हे बदलते स्वरूप अवघ्या विश्वाला कवेत घेणारे आहे. वारी म्हणजे संत तुकोबारायांच्या अभंग वचनाप्रमाणे खरोखरच ‘आनंदाचे डोही आनंद तरंग..’ अशी असते.

वारीत निघालेले विठुरायाचे डिंगर दिंड्या पताकांच्या राशींसह महाराष्ट्रातल्या विविध भागांतून पंढरीच्या पायवाटेला लागतात आणि पंढरीची पायवाट अबीर-गुलालाने माखून निघते. ‘रामकृष्ण हरी’ आणि ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’, ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ अशा नामगजराने न्हाऊन निघते. अवघ्या विश्वाच्या चांगुलपणाला जणू गवसणी घालणारा हा पंढरीच्या वाटेवरील दिंड्या पालख्यांचा ‘अनुपम्य ’ असा सोहळा. या सोहळ्यात वारकरी अनेक भक्तिनाट्यांमध्ये, भक्तिक्रीडांमध्ये दंग झालेले असतात. उभ्या रिंगणात, गोल रिंगणात बेभान होऊन नाचत असतात.

आपल्या अभंग रचना तसेच भारुडांमधून भागवत संप्रदायी संतांनी मध्ययुगीन सामाजिक परिस्थितीचे दर्शन घडवले आहे. ते घडवताना संतांची भूमिका तत्त्वचिंतकाची होती. त्यांना सामाजिक हिताची कळकळ होती. म्हणूनच ते म्हणतात,

बुडती हे जन। न देखवे डोळा ॥

म्हणवोनि कळवळा । येत असे॥

संतांनी त्यांच्या काळातील अनिष्ठ रुढी, परंपरा, अंधश्रद्धा यावर कोरडे ओढले आहेत.

शेंदरी हेंदरी दैवते। कोणी पुजती भुतेखेते॥

असे संत तुकारामांनी म्हटले आहे.

‘तीर्थी धोंडा पाणी। देव रोकडा सज्जनी॥

असा संदेश देणार्‍या संतांनी सर्वाभूती ईश्वर पाहिला.

आज आषाढी एकादशीच्या दिवशी आळंदीहून ज्ञानोबाराया आले आहेत. दिंड्या, पालख्यांच्या रूपाने देहूवरून संत तुकाराम महाराज आले आहेत. पिंपळनेरवरून निळोबाराया आले आहेत. त्र्यंबकेश्वरवरून संत निवृत्तीनाथ आले आहेत. पैठणवरून संत एकनाथ महाराज आले आहेत. दिंड्या, पालख्यांच्या प्रदक्षिणा पंढरीनगरीला सुरू आहेत. वीर विठ्ठलाचे डिंगर नाचत नाचत खेळ करीत आले आहेत.

पंढरीचा पांडुरंग हा साक्षात खेळिया, मग त्यांचे सवंगडी खेळिया नसतील तरच नवल! संत तुकोबारायांची पालखी देहूहून निघते, तर संत ज्ञानदेवांची पालखी अलंकापुराहून निघते. या पालख्यांचे रिंगण सोहळे, त्यातील विविध क्रीडा प्रकार आणि रात्री मुकामाच्या ठिकाणी रंगणारी भारुडे, चक्री भजने, कीर्तने म्हणजे विठुरायाचा अहर्निश जागर! ‘नाम चांगले चांगले । माझे कंठी राहो भले’ अशा आंतरिक उर्मीने पंढरीच्या वाटेवर भक्तिनाट्ये रंगलेली असतात. या भक्तिनाट्याचा कळस गाठला जातो तो वारीत. वारीत महाराष्ट्रातील सव दिंड्या, पालख्या एकत्र येतात. विठुरायाचा कळस दिसू लागतो अन् भक्तांचा धावा सुरू होतो.

देखोनिया पंढरपूर । जीवा आनंद अपार ॥ 1 ॥

टाळ मृदुंग वाजती। रामकृष्ण उच्चारिती ॥2॥

दिंड्या पताकाचा मेळ । नाचती हरूषें गोपाळा ॥ 3 ॥

अशा या सोहळ्याचे वर्णन संत भानुदासांनी केले आहे.

दिंड्या, पालख्यांच्या या सोहळ्यात रंगतात फुगड्या, ‘फुगडी’ या रूपकावर संतांनी अनेक अभंग केले आहेत. फुगडी म्हणजे जीवा-शिवाची फुगडी, आत्मा-परमात्म्याची फुगडी, माया-ब्रह्माची फुगडी, द्वैत-अद्वैताची फुगडी! या फुगडीतील अवस्था जणू ‘झपुर्झा’ अवस्था. बसफुगडी, खराटा फुगडी, पखवाजांची फुगडी, कोंबडा, चौघांची फुगडी असे फुगडीचे विविध प्रकार पालखी सोहळ्यात स्त्री-पुरुष करतात. ‘राधेकृष्ण, गोपाळ कृष्ण’ अशा नामगजरात फुगड्या रंगतात.

ऐक साजणी वो बाई। तुम्हां एवढे थोर नाही ।

भाव केला घरजावई । खावयासी तूप सेवई ॥ 1 ॥

फुफु फुफु फुगडी गे । तुम्ही आम्ही खेळं दोघी॥

प्रपंच केला गोड सगळा । ज्ञान फुगडीवर सम लागे॥

प्रेम तिचा चांगट गे । सुंदर पाहता अलगटगे ॥ 2 ॥

ज्ञानाच्या फुगडीवर अशी सम लागते. सम लागणे म्हणजे, मृदंगाच्या वादनातील समेवर फुगडी समाप्त होणे. ज्ञानाची अशी फुगडी संत खेळले अन् नंतर विठुरायाचे भक्त, वारकरीही खेळत आहेत. फुगडीसारखाच पिंगा प्रकारही पालखीत खेळला जातो. पिंगा हा वारकरी महिला अथवा वारकरी पुरुष किंवा दोघेही मिळून सादर करतात.

पिंगा बाई पिंगा गे । अवघा धांगडधिंगा गे ॥ सांडोनि संताची गोडी गे । कासया पिंगा जोडी गे ॥

नको घालू पिंगा गे। तुम्ही रामरंगी रंगा गे ॥

एका जनार्दनी पिंगा गे। काया वाचा गुरुचरणी रंगा गे ॥

पिंगा जन्मला कसा? निराकाराचा आकार झाला त्यातूनच पिंगा जन्मला. पिंग्यापासून शंकर झाला अन् विष्णूचे दहा अवतार झाले, असे संत एकनाथांनी ‘पिंगा’ या भारुडात म्हटले आहे.

पिंग्यासारखाच ‘टिपरी’ हा प्रकार पालखीत खेळला जातो. कृष्ण व त्याचे सवंगडी वाकड्या, पेंद्या आणि अन्य गोपजन टिपरी खेळत.

खेळसी टिपर्‍या घाई रे । वाचे हरिनाम गाई रे॥

टिपरीस टिपरी चुकू जाता भाई । पडसी यमाच्या घाई रे ॥

सहा चार अठरा गड्यांचा मेळा रे । टिपरी यांचा खेळ खेळा रे ॥

टिपरीच्या खेळात गुंतणे म्हणजे परमार्थ आणि प्रपंच या दोन्ही टिपर्‍यांसह खेळणे.

यातला तोल सांभाळला नाही, तर यमाजी म्हणजे मृत्यू झडप घालील असा संदेश ‘टिपरी’च्या रूपकाद्वारे संतांनी दिला आहे.

टिपरीसारखेच ‘विटीदांडू’च्या खेळाचे वर्णन येते.

आबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडूं ।

खेळे विटीदांडू खेळे विटी-दांडू ॥

सत्त्व विटी घेऊनि हाती धीर धरी दांडू ।

भावबळें टोल मारी नको भेऊं गांडू ॥

लक्ष चौर्‍यांशीच्या फेर्‍यांतून मुक्ती हवी असेल, तर ‘विटीदांडू सांडू नको, असे संत एकनाथांनी म्हटले आहे. विटीदांडूसारखेच चेंडुफळी, लगोरी, भोवरा, लंपडाई, सुरकाठी पारंब्या, वावडी, एकीबेकी, पटपट सावली, झोंबी, उमाण, चिकाटी, हमामा, हुतुतू अशा अनेक क्रीडांवर संतांनी रूपके रचली आहेत. या खेळांचे दर्शन पंढरीच्या वारीत होते.

वारीतील दिंड्या, पालख्यांमध्ये या क्रीडा प्रकारांचा संबंध श्रीकृष्ण चरित्राशी जोडला गेलेला आहे. यमुनेच्या तीरावर अथवा रानावनात कृष्ण आणि गोपाळांनी ज्या क्रीडा केल्या, तशाच क्रीडा वारकरी करतात. कारण, ‘गीता जेणे उपदेशिली। ते हे विटेवरी माउली॥’ अशी या संतांची आणि भक्तांची धारणा असते. वारीतल्या या विविध खेळांची रूपके अशी...

चेंडुफळी

मिळवोनी पांच सात गडी मेळीं । डाव खेळती चेंडूफळी ॥

खेळ चेंडूचा झेलारे झेला बाळा ।

विचारूनि खेळ खेळा न पडूं प्रवाहीं काळा ॥

वंदु यरडु मोरु नाकु मिळालेती गडी ।

एकाजनार्दनीं शरण अनुपम्य धरा गोडी ॥

लगोरी

खेळ मांडिला लगोरी । खेळताती नानापरी ।

चेंडू घेऊनि आपुले करीं । खेळताती एकमेक ॥

देती आपुलाला डाव। ज्याचा जैसा आहे भाव ।

तोचि जिंकीतसे वैभव । आणिक पहाती उगें वाव ॥

लपंडाई

कृष्णा कैसी खेळं लपंडाई । अनंत लोचन तुझे पाही ।

तेथें लपावे कवणे ठायीं । तुझें देखणें लागलें पाहीं ॥ 1 ॥

कान्होबा पाववी आपुल्या खुणा ॥ ध्रु ॥

लपूं ममतेच्या पोटीं। जेथें तेथें तुझीच द़ृष्टी ।

तेथें लपायाची काय गोष्टी । तुझें देखणें लागलें पाठी ॥2॥

सूरकाठी

घेऊनियां हाती काठी । पोरा खेळसी सुरकाठीरे ॥ 1 ॥

खेळें सुरकाठी पोरा खेळे सुरकाठी ।

विषयाची वासना धरुनी चढसी प्रपंच्याचे झाडीं ॥ 2 ॥

बुडापासून शेंडारे चढसी फांदो फांदीरे ।

कामकोध पोरें लागती पाठीं म्हणती माझा दादारे ॥ 3 ॥

एकीबेकी

एकीबेकी पोरा सांग झडकरी ।

एकी म्हणता जिंकिशी बेकी म्हणता हरी ॥ ध्रु ॥

नव्हे काई बाई तेथे झाले एक शून्य ।

त्यासी फांटा फुटतां मग लेखा आले जाण ॥ येकीबेकी ॥ 1 ॥

‘नाचत नाचत जाऊ रे खेळिया’ अशी ही खेळियांची वारी म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचा आनंद सोहळा! वारी हे समूहभक्तीचे प्रतीक आहे. ती केवळ व्यक्तिगत साधना नाही, तर समूह साधना आहे. पंढरपूरच्या वारीत आध्यात्मिक उद्बोधन घडते, तसेच समाजप्रबोधनही घडते. किंबहुना आध्यात्मिक उद्बोधन आणि सामाजिक प्रबोधनाचा सुंदर समन्वय म्हणजे पंढरीच्या पांडुरंगाचा हा महाउत्सव! ‘नामसंकीर्तन साधन पै सोपे। जळतील पापे जन्मांतरीची॥’ ही श्रद्धा वारकर्‍यांच्या मनात असते. नामसंकीर्तनाने आत्मोद्धार होतो. सोबत समाजोद्धार घडवण्याचे सामर्थ्यही वारीत असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news