

कुडाळ : स्पंदना स्फूर्ती फायनान्स कुडाळ शाखेच्या अपहार प्रकरणातील कर्ज विभागाचे अधिकारी दिलीप राजाराम पाटील (32, रा. कोल्हापूर) याला अखेर पुणे-तळेगाव येथून ताब्यात घेण्यात यश आले. त्याने 5 लाख 47 हजार 635 रुपयांचा आर्थिक अपहार केला होता. याबाबत 20 आक्टोबर 2024 रोजी कुडाळ पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली.
याबाबतची तक्रार झोनल ऑफिसर उमेश मारोराव हलमारे यांनी कुडाळ पोलिस ठाण्यात दिली होती. यानुसार दिलीप पाटील याच्यावर कुडाळ पोलिस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्पंदना स्फूर्ती फायनान्स मॅनेजमेंट विभागाचे झोनल मॅनेजर उमेश हलमारे यांनी कुडाळ पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार कुडाळ शहरात स्पंदना स्फूर्तीचे शाखा कार्यालय सन 2017 पासून कार्यरत आहे.
कुडाळ शाखेमध्ये कर्ज विभागात अधिकारी म्हणून दिलीप पाटील हे 2019 ते 2024 या कालावधीत कार्यरत होते. दिलीप राजाराम पाटील (रा. विद्यामंदिर जवळ मजनाळ, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) हे महिलांच्या समूहांना ग्रुप गॅरंटीवर लघू मुदतीकरिता कर्ज वाटप करणे व देय तिथीनुसार कर्ज गोळा करणे आणि गोळा केलेला हप्ता सिस्टीममध्ये कर्जदारांच्या खात्यावर जमा करणे अशी कामे ते करत होते.
दरम्यान सावंतवाडी-साईलवाडा येथील एका कर्जदारासह अन्य काही महिला कर्जदारांनी प्रीलोन बंद करून सुद्धा त्यांच कर्ज खाते सुरू असल्याचे कंपनीच्या निदर्शनात आणून दिले होते. त्याबाबत शहानिशा करून कंपनीच्या अंतर्गत चौकशी केली असता माहे जानेवारी 2022 ते जुलै 2024 या कालावधी मध्ये एकूण 6 लाख 57 हजार 785 रुपये रकमेचा कर्जदारांकडून तिथीनुसार हप्ता व मुदतपूर्व रक्कम गोळा केली त्यापैकी 1 लाख 10 हजार 150 रुपये रक्कम सिस्टीम मध्ये कर्जदारांच्या खात्यावर भरणा केली व शिल्लक 5 लाख 47 हजार 635 रुपये रकमेचा आर्थिक व्यवहार अपहार झाल्याचे खातेदार व कंपनीच्या निदर्शनास आले होते.
याबाबत दिलीप पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली होती यानंतर त्याचा मोबाईल बंद आढळत होता. घरी काही कर्मचारी यांना पाठवले असता श्री. पाटील हे घरीही आढळून न आल्याने अखेर कुडाळ पोलिस ठाण्यात दिलीप राजाराम पाटील यांच्या विरोधात झोनल ऑफिसर उमेश हलमारे यांनी 20 नोव्हेंबर 2024 तक्रार दाखल केली होती. कुडाळ पोलिसांनी श्री. पाटील यांच्या विरोधात अपहाराचा गुन्हा दाखल केला होता. यानंतर तो फरार झाला होता.स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने याबाबत तपास सुरू केला होता. यादरम्यान संशयित हा पुणे-तळेगाव एमआयडीसी येथे हुंडाई कंपनी परिसरामध्ये मिळून आला. त्याला ताब्यात घेऊन त्याला कुडाळ पोलिस ठाणे येथे हजर करण्यात आले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मोहन दहिक, अति. पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिल हडळ, एएसआय श्री. जामसंडेकर, हेड कॉन्स्टेबल श्री. जॅक्सन, श्री. कांडर (सर्व स्थानिक गुन्हे शाखा सिंधुदुर्ग), सायबर विभागाचे पोलिस उपनिरीक्षक गणेश कराडकर यांनी केली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक प्रवीण धडे करत आहेत.