

Kudal Road Accident
कुडाळ : कुडाळ एमआयडीसी - नाबरवाडी रस्त्यावर एमआयडीसी येथील गॅस सिलिंडर गोडाऊन नजिकच्या वळणावर ओमनी कार आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक बसून अपघात झाला. यात दुचाकीवरील दोन युवकांना किरकोळ दुखापत झाली. त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र यातील एका युवकाची अचानक प्रकृती बिघडल्याने त्याला येथे प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आले.
हा अपघात शनिवारी दुपारी 12.30 वा.च्या सुमारास झाला. ओमनी कार एमआयडीसीतून अंतर्गत रस्त्याने नाबरवाडीच्या दिशेने येत होती तर युवक दुचाकी घेऊन एमआयडीसीच्या दिशेने जात होते. दोन्ही गाड्यांमध्ये समोरासमोर धडक बसली. यात दुचाकीधारक व त्याच्या समवेत मागे बसलेला असे दोघेही युवक रस्त्यावर पडले.
अपघाताची माहीती मिळताच शहरातील आजी - माजी लोकप्रतिनिधी, नागरिक व नातेवाईकांनी रूग्णालयात गर्दी केली होती. कुडाळ पोलिसांनीही रूग्णालयात धाव घेतली होती. मात्र सायंकाळपर्यंत पोलिसात अपघाताची नोंद झाली नव्हती. अपघातात दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे.