

नागेश पाटील
सावंतवाडी : कोकणातील गणेशोत्सवाला महिना शिल्लक असताना मुंबईतून रेल्वेने कोकणात येणार्या प्रवाशांची चिंता अधिक वाढली आहे. प्रवाशांना रेल्वेचे तिकिट मिळेनासे झाले असून या सणासाठी रेल्वेचे आगावू आरक्षण फुल्ल झाले त्यामुळे चाकरमान्यांची भिस्त आता खाजगी वाहनांवर आहे. कोकणात टर्मिनसचे काम प्रलंबित राहिल्याने जादा गाडया सोडण्यावर निर्बंध येत आहेत. तर गेली 15 वर्षे मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू असून ते अपूर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे येणार्या चाकरमान्यांना दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
कोकणात येण्यासाठी हवाई मार्गही असून तो प्रवाशांना परवडणारा नाही. तसेच रेल्वेची रो-रो सेवा देखील सक्षम पर्याय ठरू शकत नाही. आता पालकमंत्री नितेश राणे यांनी जलमार्गाद्वारे सागरी रो-रो सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. परंतु ती सेवा गणेशोत्सव सणापूर्वी उपलब्ध करुन दिल्यास त्याचा फायदा असंख्य प्रवाशांना घेता येईल. अन्यथा मुंबईकर चाकरमान्यांना गावी परतायला किती तास लागतील कुणास ठाऊक!
या सणाला जेमतेम महिन्याभराचाच कालावधी उरल्यामुळे मुंबईतून कोकणात येणार्या चाकरमान्यांची लगबग वाढली आहे. सणासाठी येणार्या चाकरमान्यांनी दरवर्षी प्रमाणे रेल्वेचे आगावु बुकिंग केले आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील सर्व नियमित जादा गाडयांचे आरक्षण 1 सप्टेंबरपर्यंत फुल्ल झाले आहे. 8 सप्टेंबरपर्यंत परतीच्या प्रवासासाठी आरक्षण प्रतीक्षा यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. परिणामी यंदा कोकणात जाणार्या प्रवाशांना स्वतःची वाहने तसेच अन्य खासगी गाड्यांचा, पर्यायांचा आधार घ्यावा लागणार आहे.
सर्वच राजकीय पक्षांनी गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाण्यासाठी भक्तांना यंदा मोफत प्रवास व्यवस्था जाहिर केल्याने त्यातून चाकरमान्यांना थोडाफार दिलासा मिळणार आहे, परंतु अन्य मार्गांचा विचार करता चाकरमान्यांसाठी कोकणात जाण्याकरिता मुंबई-गोवा महामार्ग, अन्य मार्ग, हवाई मार्ग, कोकण रेल्वेची रो-रो सेवा तर जलमार्गाद्वारे सागरी रो-रो सेवा असे अन्य पर्याय आता उरणार आहेत.
गेली 15 वर्षे मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू असून तो महामार्ग अद्यापही पूर्ण झालेला नाही. संगमेश्वर ते रायगड पर्यंतचा पट्टा अद्यापही अपूर्ण असून त्या मार्गाने येणार्या चाकरमान्यांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे. शिवाय मोठ्या प्रमाणावर चाकरमानी या मार्गाने गावी येत असल्याने वाहनांची वर्दळ, खराब रस्ता आदी सर्व बाबी डोकेदुखी ठरणार आहेत. पुणे, कोल्हापूर मार्गे प्रवाशांना स्वतःची वाहने अथवा खासगी वाहनांनी येण्याचा पर्याय यामुळे नाईलाजाने स्वीकारावा लागणार आहे.
दरवर्षी गणेशोत्सवात चाकरमान्यांना या सर्व समस्यांचा सामना करत कोकणात यावे लागते, त्यामुळे लोकप्रतिनिधींनी अर्धवट स्थितीत असलेल्या मुंबई -गोवा महामार्गाचे काम जलद गतीने पूर्ण करणे आवश्यक आहे. कोकणात येण्यासाठी हवाई मार्ग आहे. मात्र तो फार खर्चिक असल्याने सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारा नाही.
मुंबई-गोवा महामार्गाची दुर्दशा पाहता अन्य मार्गांद्वारे कोकणात चाकरमान्यांना पोहोचावे लागणार आहे. कितीही नियोजन केले तरीही यंदाही दरवर्षीप्रमाणे रेल्वेच्या गाडया मिळणे दुरापास्त आहेत. सध्या रेल्वे गाडयांचे आरक्षण तब्बल 350 प्रतीक्षा यादींवर पोहोचले आहे तर ते पुढे वाढूही शकते. 1 जुलैपासून कोकण रेल्वेने नियमात बदल केल्याने आता प्रतीक्षा यादीवरही प्रवास करणे अवघड होणार आहे. तब्बल 4 लाखहून अधिक प्रवासी कोकणात सणासाठी दाखल होतात. देशभरातून कोकणात गणेशोत्वासाठी येणार्या चाकरमान्यांची संख्या जास्त आहे. रेल्वेने 2 लाख, खासगी गाडयांनी 50 हजार, एसटी बसने 20 हजार प्रवासी कोकणात दाखल होतात. यंदा जास्तीत-जास्त प्रवासी गणेशोत्सवापूर्वी दाखल होण्याची शक्यता आहे. मधोमध मुंबई-गोवा महामार्गावर, पुणे, कोल्हापूर, गगनबावडा या रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे याचा खड्डयांतून प्रवास करावा लागणार आहे. उत्सव कालावधीत कोकण रेल्वेने यंदा मुंबई- सावंतवाडी ही नियमित गाडी सुरू केली आहे. एलटीटी-सावंतवाडी आणि एलटीटी-मडगांव अशा जिल्ह्यांत जाण्यासाठी सहा जादा गाडया सोडल्या आहेत. काही गाडया आठवडयातून एकदा तर काही रोज धावणार आहेत. अद्यापही 60 ते 70 हजार प्रवासी तिकीटांच्या प्रतीक्षेत आहेत. दरवर्षी एसटी महामंडळाकडूनही गणेशोत्सवासाठी बसचे नियोजन केले जाते. त्याचाही लाभ प्रवासी घेतात.
आता मुंबई महापालिका त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळे चाकरमान्यांची विशेष काळजी राजकीय पक्ष घेत आहेत ही बाब सणासुदीत प्रवााशांना दिलासा देणारी आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात येण्याकरिता जरी अन्य पर्याय असले तरी ते सर्वच पर्याय चाकरमान्यांना त्यांच्या सोईनुसार परवडणारे अथवा फायद्याचे ठरतीलच असे नाही. सावंतवाडी टर्मिनस पूर्णत्वास आले असते तर जादा कोच,जादा गाडया यांचे नियोजन झाले असते. कोकण रेल्वेचे दुपदरीकरण अद्यापही अडकले आहे. एकच रेल्वे मार्ग असल्यामुळे जादा गाडया धावू शकत नाहीत. या सर्व बाबींचा विचार करता या वर्षी पुन्हा कोकणात गणेशोत्सवासाठी येणार्या चाकरमान्यांच्या पदरी निराशाच येण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांकरिता मुंबई भाऊच्या धक्क्यावरून दोन बोटी चाकरमान्यांना घेऊन तसेच त्यांच्या गाडया घेवून सुटणार आहेत. या बोटींची प्रवासी क्षमता 620 एवढी असून 60 वाहने एकाचवेळी सोबत नेता येणार आहेत. जलमार्ग, सागरी रो-रो सेवा सुरू करण्याकरीता तातडीने दोन नव्या बोटी खरेदी करण्यात आल्या आहेत. मुंबई ते सिंधुदुर्ग अवघ्या साडेचार तासात चाकरमानी या सेवेद्वारे पोहोचू शकतात त्यामुळे त्यांना होणार्या त्रासापासून सुटका होऊ शकते. परंतु याबाबत अजूनही काही कार्यवाही बाकी आहे.परिणामी ही सेवा कोकणवासीयांना किती लाभदायक ठरते हे या गणेशोत्सवात दिसून येईल.