

सचिन राणे
नांदगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर सुरू करण्यात आलेली रो-रो कार सेवा शनिवारी रात्री 11.30 वा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव स्थानकात दाखल झाली. या रो-रो सेवेमधून जिल्ह्यातील चार मुंबईकर आपल्या कारमधून कुटुंबीयांसोबत दाखल झाले. कोकण रेल्वे प्रवासी संघ व कोकण रेल्वेकडून त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. शनिवारी दु. 3 वा. या सेवेला हिरवा झेंडा दाखविण्यात आला होता.
पहिल्या रो-रो कार सेवेत एकूण पाच कार आणि 19 प्रवाशांनी प्रवास केला. या दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात नांदगाव या एकमेव स्थानकावर ही सेवा थांबणार आहे.
नांदगाव : कोकण रेल्वे मार्गावरील रो-रो कार सेवा शनिवारी रात्री नांदगाव येथे दाखल झाली. पहिल्या फेरीसाठी कोलाड-नांदगाव प्रवासासाठी चार कारचे आरक्षण झाले होते. 10 बीआरएन वॅगन, द्वितीय श्रेणीचा एक डबा, एसआरएलचा एक डबा अशी या रो-रो सेवेची संरचना होती. या रोरो कार वाहतूक सेवेसाठी कोलाड ते वेर्णा प्रवासासाठी प्रतिकार रु. 7875 व कोलाड-नांदगाव प्रवासासाठी प्रति कार 5460 रु. भाडे कोकण रेल्वेने निश्चित केले आहे. वाघेरीचे माजी सरपंच संतोष राणे, पियाळीतील सामाजिक कार्यकर्ते बाबू घाडी, नांदगाव स्टेशन मास्तर मधुकर मातोंडकर व प्रवासी उपस्थित होते.
40 कारची क्षमता: या रो-रो सेवेची क्षमता 40 कार आहे (प्रति वॅगन 2 गाड्या). 18 ऑगस्टपर्यंत मिळालेल्या एकूण बुकिंगमध्ये प्रतिट्रिप 16 पेक्षा कमी कार असल्यास, ही सेवा चालविली जाणार नाही आणि नोंदणी शुल्क परत केले जाईल, असे सांगण्यात आले होते.
कार रो-रो ट्रेनमध्ये लोड केल्या की, ड्रायव्हर किंवा कोणत्याही सह-प्रवाशाला गाडीत बसून प्रवास करण्याची परवानगी नाही. ड्रायव्हर व प्रवाशांना रो-रो ट्रेनशी जोडलेल्या पॅसेंजर कोचमध्येबसून प्रवास करावा लागतो. त्यासाठी त्यांनी निर्धारित प्रवासी भाडेही भरावे लागते.प्रत्येक कार बुकिंगसाठी जास्तीत जास्त 3 प्रवाशांना या सेवेतून प्रवास करण्याची परवानगी आहे. जर काही अतिरिक्त प्रवासी असतील तर त्यांना जोडलेल्या कोचमध्ये बर्थ, सीट रिकाम्या असतील तरच प्रवासाची परवानगी दिली जाणार आहे. असे कोकण रेल्वेकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.
गणेशोत्सव काळात कोकण रेल्वे प्रशासनाने रो-रो कार सेवेसाठी कमीत कमी 16 वाहनांची अट घातली होती. परंतु, प्रवाशांकडून फारसा प्रतिसाद न मिळाल्याने पहिल्या रो-रो कार सेवेसाठी 16 वाहनांची अट शिथिल करण्यात आली आणि ही रोरो कार सेवा सुरू केली आहे. मात्र पुढील रो-रो कार फेरीसाठी कार आरक्षण संख्या अपुरी असल्यास फेरी रद्द केली जाणार आहे. तसेच 24 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर दरम्यानच्या रो-रो कार सेवेच्या प्रवासासाठी तीन दिवस आधी आरक्षण केले जाणार आहे.
शनिवारी दु. 3 वा. या सेवेला हिरवा झेंडा दाखविण्यात आला होता. पहिल्या रो-रो कार सेवेत एकूण पाच कार आणि 19 प्रवाशांनी प्रवास केला. या दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात नांदगाव या एकमेव स्थानकावर ही सेवा थांबणार आहे.
कोकण रेल्वेने नियोजन चांगले केले होते. कार ट्रेनवर चढविण्यासाठी सध्या रायगड जिल्ह्यातील कोलाड स्थानक गाठावे लागते. यासाठी मुंबई ते कोलाड असा सुमारे 130 कि.मी.चा प्रवास रस्त्याने करावा लागतो. यासाठी किमान दोन ते तीन तास लागतात. हे अंतर कमी झाल्यास या सेवेला चांगला प्रतिसाद मिळेल. मुंबईपासून किमान 50 कि.मी. अंतरावर कार अपलोड सेवा उपलब्ध असावी.
संजय सावंत, सावंतवाडी-कोलगाव, रो-रो कार सेवेचे प्रवासी