

गणेश जेठे
हे गंभीर वास्तव आहे की, कोकणातील गावागावांत अनेक तरुण लग्नाविना जीवन जगत आहेत. यंदा लग्नाचे मुहूर्त भरपूर आहेत; पण लग्नासाठी मुलगीच नाही. लग्नासाठी इच्छुक असलेल्या सहा मुलांमागे केवळ एकच मुलगी लग्नाची आहे. उरलेल्या पाच तरुणांना विवाह बंधनात अडकविण्यासाठी मुलगी कुठून आणायची हा प्रश्न तरुणांच्या आई-वडिलांसमोर उभा ठाकला आहे.
कोकणात दहावी, बारावी परीक्षांचा निकाल राज्यात सर्वाधिक लागतो. अनेक विद्यार्थी 90 ते 100 टक्के गुण मिळवतात. अर्थात यात मुलींचे प्रमाण अधिक आहे. मुलांच्या तुलनेत मुली अभ्यास अधिक करतात. त्यामुळे या मुली शालांत परीक्षा पास होऊन महाविद्यालयीन शिक्षण घेतात. उच्च शिक्षण घेतल्यानंतर कोकणात रोजगार उपलब्ध नसतोच. शेतीत काम करायची तयारी नाही. त्याशिवाय शहरी लाईफस्टाईलचे भयंकर आकर्षण असतेच. त्यामुळे मुली शहरे गाठतात. नातेवाईक, मैत्रिणींकडे राहून पुढचे शिक्षण पूर्ण करतात किंवा मग जॉब करतात.
एकदा या मुलींना जॉब लागला की त्या शहरातच रमतात. लग्नाची वेळ जवळ आली की नवरा मुलगा गावाकडे राहणारा असता नये याची काळजी घेतात. शहरी लाईफस्टाईल सोडून गावी परतण्याची या मुलींची तयारी नाही. मग एक दिवस तिथेच, शहरातच एखाद्या मुलाशी लग्नगाठ बांधण्याची पावले टाकतात. आई-वडीलही आता फारसे आढेवेढे घेत नाहीत. मुलींचे चांगले होते आहे ना, असा विचार करून ‘हो’ देतात आणि मग शहरातच मुलीच्या लग्नाचा मांडव सजतो.
मुलगा कोकणातलाच हवा असं नाही
बरं, एक काळ असा होता की, कोकणातील शहरात राहणारी मुलगी शक्यतो कोकणातल्या मुलाशी लग्न करायची. कधी तो शहरात राहणारा असायचा, तर कधी-कधी तो गावातला तरुणही असायचा. परंतु आता गावच्या मुलाचा विचारही होत नाही. त्यापुढे जावून तो मुलगा कोकणातलाच हवा असेही नाही. कोकणातली शहरात राहणारी मुलगी आता पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातल्या मुलाशी लग्न जुळवू लागलीय. एवढंच नव्हे तर अगदी परप्रांतीय तरुणाशीही विवाहबद्ध होऊ लागली आहे.
मुली जास्त शिकतात
मुलींच्या तुलनेत अभ्यास करणाऱ्या मुलांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे काही मुले उच्च शिक्षणापर्यंत पोहोचतच नाहीत. त्या तुलनेत अपवाद वगळता सर्वच मुली उच्च शिक्षण घेतात. अशा मुली कमी शिकलेल्या आणि गावात राहणाऱ्या तरुणाशी लग्न कसे करणार? हा खरा प्रश्न आहे. यात एखादा तरुण उच्चशिक्षित असला आणि तो गावात राहत असला तरीही शहरात राहणारी मुलगी त्याच्याशी संसार मांडायला तयार नाही. मग हे तरुण गावात तरी राहतात का? असा एकप्रश्न निर्माण होतो. मुळात मुलगी शिकली की ती गावात न राहता शहराकडे जाते. कारण तिला तशी नोकरी उपलब्ध नसते. परंतु अनेक कारणांनी मुलगे मात्र गावी राहतात. काहींना आपल्या वडिलांचा व्यवसाय पुढे न्यायचा असतो, तर काहींना वाडवडिलांनी उभ्या केलेल्या बागायती सांभाळायच्या असतात. काहींना तर वडिलोपार्जित जमिनी, घरे सांभाळण्यासाठी गावात राहावे लागते.काहीजण मुंबई, पुणे सारख्या शहरात जावून राहायचे म्हटले तर तिथे स्वतःचे घर नाही, म्हणून गावीच राहणे पसंत करतात.
गावात राहणाऱ्या तरुणांची संख्या अधिक
वेगवेगळ्या कारणांनी गावात राहत असलेल्या तरुणांची संख्या मुलींपेक्षा कितीतरी अधिक आहे. एखाद्या 30-35 घरांच्या आवाठात, वाडीत साधारण 10-12 तरुण असे आहेत की त्यांचे वय लग्नाचे झाले आहे परंतु त्याच वस्तीत राहणाऱ्या परंतु लग्नाचे वय झालेल्या मुलींची संख्या आहे एक ते दोन इतकीच. खरंतर गावात राहणाऱ्या एक-दोन मुली गावात राहणाऱ्या मुलाशी लग्न करण्यास तयार नसतात. परंतु तसा निर्णय घेतलाच तरी इतर मुलांचे काय? हा प्रश्न उरतोच. त्यामुळे गावोगावी असे अनेक तरुण आहेत की, ज्यांचे लग्नाचे वय झाले तरी मुलगी नाही म्हणून लग्न होत नाही. असेही अनेक तरुण आहेत की त्यांचे वय 40 वर्षे इतके झाले तरी लग्न झालेले नाही. जेव्हा हे तरुण गावात एकत्र येतात तेव्हा त्यांच्यात स्वतःच्या भवितव्याची चर्चा होते. आपले पुढे कसे होणार? हा प्रश्न उभा ठाकतो. त्यात काहीजणांनी तर ‘आपण लग्नच करायचं नाही’ असं ठरवून टाकलंय. आई-वडिलांना सांगून अनेकांनी लग्नाचा विचार सोडून दिलाय. आजवर जगलो तसे पुढेही जगू म्हणत वस्तुस्थिती स्वीकारली आहे. 10 वर्षांपूर्वी कारवार भागातील मुली मोठ्या प्रमाणात लग्नासाठी कोकणात यायच्या. आता तिथेही फसवणूक होऊ लागली आहे. कारवारमधील एखादी मुलगी अनेकांशी लग्न करून गंडा घालते असे प्रकार खूप वाढले म्हणून आता त्याही फंदात कुणी पडत नाही.
रोजगार निर्मितीचीही गरज
कोकणात पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे प्रमाण चांगले आहे. परंतु ते 17-18 वर्षे वयापर्यंत टिकते. नंतर मुलींचे स्थलांतर मुलांच्या तुलनेत वाढत चालल्याने मुलांच्या लग्नाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर मार्ग आज तरी दृष्टिपथात नाही. मार्ग एकच आहे, शहरांकडे जाणाऱ्या मुलींना कोकणातच थांबवावे लागेल आणि त्यासाठी रोजगार निर्मिती करावी लागेल. त्यशिवाय बदलती लाईफस्टाईलही स्वीकारावी लागेल.
लग्नासाठी मुली नसल्या तरी मुहूर्त मात्र भरपूर
एकीकडे लग्नासाठी मुली नाहीत हा गंभीर प्रश्न असताना यंदा लग्नाचे मुहूर्त मात्र खूप आहेत. जुलै 2026 पर्यंत पुढील दहा महिन्यात 49 दिवस लग्नासाठी शुभमुहूर्त आहेत. फेबु्रवारी महिन्यात सर्वात जास्त मुहूर्त आहेत. या महिन्यात 10 शुभ दिवस आहेत. मार्च महिन्यात 6 दिवस तर एप्रिल महिन्यात 5 दिवस लग्नासाठी शुभमुहूर्त आहेत. मे महिन्यात 9 दिवस आणि जून महिन्यात 4 दिवस लग्नासाठी मुहूर्त आहेत. जुलै महिन्यातील 1,3,4,7,8 आणि 11 या शुभ तारखा आहेत.