

खाडीपट्टा : रघुनाथ भागवत
दिवाळीनंतर तुलशी विवाह पर्व संपल्यानंतर लगेचच लग्न समारंभाला सुरुवात झाली आहे. शहरासह ग्रामीण भागात सध्या लग्न जुळविण्याचा हंगाम सुरू आहे. सर्वत्र साखरपुडा, लग्न जमविणे व जमलेल्या लग्नाचा बार उडविण्याचे काम काही प्रमाणात सुरू आहे. परंतु ग्रामीण भागातील उपवर मुलांच्या लग्नाची गंभीर समस्या समोर येत असून बेरोजगारीमुळे मोठ्या प्रमाणात लग्नाच्या गाठी जुळून येत नसल्याचे ऐकायला मिळत आहे.
मुलींचे लग्न अठरा ते वीस वर्ष होईपर्यंत होते, परंतु मुली संगणक, शिलाई काम, ब्युटीपार्लर असे कोर्स पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभे राहून रोजगार उपलब्ध करीत असतात. काही मुली तर बीएड, डॉक्टर, इंजिनीयर, वकील आदी पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेऊन त्या नोकरी करताना दिसतात. काही मोठ्या पदाच्या नोकऱ्या मिळविल्या आहेत. मुलींच्या घटत्या जन्मदराने आता हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला अशी विनवणी करण्याची वेळ नवरा मुलावर आली आहे.
गतिमान होत चाललेली शिक्षण चळवळ यामुळे काही प्रमाणात ग्रामीण भागातील नवऱ्या मुलाला लग्न जमवताना अडचणी येत असल्याचे विदारक चित्र आहे. यामुळे लग्नाविना राहण्याची वेळ काही तरुणांवर आली आहे. ग्रामीण भागातील मुलगी सुद्धा लग्नाची घाई न करता शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करताना दिसत आहे.
बहुसंख्य व्यसनाधीन तरुणांना मुलींनी नाकारल्याने नापसंत करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढले आहेत. त्यामुळे उपवर मुलांनी एक प्रकारची धास्तीच घेतली आहे. एकीकडे महागाईचा पारा चढल्यामुळे तसेच धावपळीच्या युगात वेळ नसल्यामुळे झटपट लग्न उरकण्यावर मध्यस्थीमंडळी भर देत आहेत, तर दुसरीकडे मोठ्या धामधुमीत विवाह समारंभ आयोजित करण्याचे बेत अनेकांनी आखलेले देखील दिसत आहेत.
शेतकरी नवरा नको...
काही वर्षांपूर्वी मुले आणि मुली यांच्या संख्येमध्ये तफावत असल्याने वयात आलेल्या तरुणांचे लग्न रखडायची. आतादेखील काही ग्रामीण भागातील तरुणांची लग्न अनिश्चित काळासाठी या कारणामुळे लांबणीवर पडली आहेत. तेव्हा ग्रामीण भागातील मुलींनी तो सुशिक्षित असला, तरी केवळ शेतकरी आहे म्हणून मुलांना नाकारण्याचा हा प्रकार खरच बदलत्या सामाजिक, आर्थिक परिस्थिती लक्षात घेता खूप गंभीर होत चालला आहे.
पस्तीशी गाठली तरी लग्न जमेना...
दरवर्षी ज्योतिषांकडे जाऊन यावर्षी तर योग आहे का हे विचारण्याचा धडाका सुरूच आहे. त्यांचे वय वाढतेय, वाढत चाललेला आहे. त्याचे वय पसतीशी पोहचले तरी आपल्या मुलाला मुलगी मिळेना आणि मुला-मुलीत जास्त अंतर असेल, तर लग्न जमेलच असे कसे करत आज प्रत्येक गावांमध्ये दहा, वीस नवरदेव बाशिंग घेऊन तयार आहेत, पण मुली काही मिळायला तयार नसल्याचे विदारक चित्र समोर येत आहे.