

बेळगाव : लग्न जुळत नाहीत, नव्हे लग्नासाठी मुलीच दाखवण्यात येत नाहीत. त्यामुळे आम्ही आता मठात राहतो, त्यासाठी मठ बांधून द्या, अशी अजब मागणी मंड्या जिल्ह्यातील मुद्दूर तालुक्यातील मरळीगे गावातील तब्बल 40 मुलांनी ग्राम पंचायतीकडे अर्जाद्वारे केली आहे. त्यामुळे शेतकरी कुटुंबातील मुलांच्या लग्नाचा विषय चर्चेला आला आहे.
गेल्या काही वर्षांत लग्नाळू मुलांना मुली मिळत नाहीत. त्यामध्ये शेतकरी नवरा नको गं बाई, हा प्रकार अत्यंत गंभीर बनला आहे. या सामाजिक समस्येवर प्रकाश टाकण्यासाठी अनेक गावांतील युवकांनी आतापर्यंत विविध प्रकारे लक्ष वेधून घेतले आहे; पण आता मुली मिळत नाहीत. त्यामुळे आम्ही मठाची व्यवस्था बघतो, संन्यासी होतो, अशी भावना मंड्या जिल्ह्यातील युवकांनी व्यक्त केली आहे.
मुद्दूर तालुक्यातील मरळीगे गावात 9 डिसेंबर रोजी ग्रामसभा झाली. या ग्रामसभेत तब्बल चाळीस युवकांनी आमचे वय निघून जात आहे. लग्नासाठी मुली दाखवण्यात येत नाहीत. आमचे लग्न होत नाही. त्यामुळे पुढचे आयुष्य मठात घालवायचे आहे. त्यासाठी ग्राम पंचायतीने मठ बांधून द्यावा, अशी अजब मागणी केली आहे. ग्राम पंचायत अध्यक्षांनी या अर्जाचा स्वीकार केला असून, पीडीओंनी हा अर्ज तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला आहे. त्यामुळे या प्रकाराची राज्यभरात जोरात चर्चा सुरू झाली आहे.
ग्राम पंचायतीने या अर्जावर पुढील ग्रामसभेत चर्चा करण्यात येणार आहे. युवकांच्या मागणीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात आले आहे. त्यामुळे यातून काय मार्ग निघतो, हे पाहावे लागेल, असे कळविले आहे.