

वैभववाडी : तालुक्यात कोसळणार्या मुसळधार पावसाने रविवारी रात्री करूळ घाटात रौद्ररूप धारण केले. गगनबावडा हद्दीत दरड कोसळून एक महाकाय दगड थेट रस्त्यावर आल्याने प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. या घटनेमुळे घाटातील वाहतूक सुमारे अर्धा तास पूर्णपणे ठप्प झाली होती. मात्र, ठेकेदार कंपनीने तत्काळ कार्यवाही करत वाहतूक सुरळीत केल्याने प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास गगनबावड्यापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. मुसळधार पावसामुळे डोंगराचा काही भाग आणि एक भला मोठा दगड रस्त्यावर आला, ज्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. याची माहिती मिळताच घाटरस्त्याचे काम पाहणार्या वेल्हाळ कंपनीच्या कर्मचार्यांनी जेसीबीसह घटनास्थळी धाव घेतली.
जेसीबीच्या मदतीने काही वेळातच रस्त्यावरील माती आणि लहान दगड हटवून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र, रस्त्याच्या मधोमध असलेला महाकाय दगड हटवणे मोठे आव्हान होते. सोमवारी सकाळी मशिनच्या साहाय्याने हा दगड फोडून त्याचे तुकडे करण्यात आले आणि रस्त्यावरून पूर्णपणे बाजूला करण्यात आले. सायंकाळी 4 वाजल्यानंतर घाटातील वाहतूक पूर्णपणे सुरळीत झाल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिली. या जलद कार्यवाहीमुळे मोठा अनर्थ टळला.
थरारक घटना: रविवारी रात्री 9 वाजता मुसळधार पावसामुळे दरड कोसळली.
वाहतुकीचा खोळंबा: महाकाय दगडामुळे घाटातील वाहतूक अर्धा तास ठप्प.
तत्पर कार्यवाही: ठेकेदार कंपनीने जेसीबीच्या मदतीने एकेरी वाहतूक सुरू केली.
संकट दूर: सोमवारी मशिनच्या साहाय्याने दगड फोडून वाहतूक पूर्णपणे सुरळीत.