

वैभववाडी : नापणे-कोकाटेवाडी येथील श्रीमती अंजली अनंत खाडये या वृद्ध महिलेच्या राहत्या घरावर झाड कोसळून घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी अंजली खाडे या शेजार्यांकडे गेल्यामुळे अपघातातून त्या थोडक्यात बचावल्या आहेत.
ऐन पावसाळ्यात घराचे छप्पर कोसळल्यामुळे या वयोवृद्ध महिलेच्या निवार्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्यावर्षी पावसाळ्यात सुद्धा झाडाची फांदी पडून नुकसान झाले होते. घराच्या नुकसानीची पाहणी व पंचनामा तलाठी श्री. कडुलकर यांनी केला आहे.
अंजली खाडे या एकट्याच वयोवृद्ध महिला आपल्या कोकाटेवाडी येथील घरात राहतात. त्यांच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. तर मुली विवाहित आहेत. शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्या शेजार्यांकडे गेल्या होत्या. याच दरम्यान घरात शेजारी असलेले जुनाट झाड अचानक घरावर कोसळले. यामुळे घराच्या छपराचे मोठे नुकसान झाले आहे.सुदैवाने यावेळी त्या शेजार्यांकडे गेल्या होत्या. त्यामुळे सुदैवाने त्या या वर्गातून वाचल्या.त्यातच पाऊस पडत असल्यामुळे घरातील सामानाचे सुद्धा नुकसान झाले आहे.